
नागझिरात 'चष्मेवाला' पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण
विदर्भातील निसर्गसंपन्न अशा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेमध्ये निसर्गाचे एक अनोखे आणि दुर्मिळ रूप समोर आले आहे. येथील समृद्ध जैवविविधतेच्या परिसरात निसर्गप्रेमी आणि ख्यातनाम पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यांनी अत्यंत दुर्मिळ अशा ‘चष्मेवाला’ (ओरिएंटल व्हाईट आय) पक्ष्याचे दर्शन घेतले असून, आपल्या कॅमेऱ्यातून या पक्ष्याचे एक विलोभनीय छायाचित्र टिपले आहे. ‘चष्मेवाला’ हा पक्षी आकारमानाने अत्यंत लहान असला तरी, त्याच्या शरीररचनेमुळे तो पक्षीप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. या पक्ष्याच्या डोळ्याभोवती पांढऱ्या रंगाचे एक वलय असते, जणू काही त्याने डोळ्यावर ‘चष्मा’ घातला आहे, म्हणूनच याला चष्मेवाला असे म्हणतात.(फोटो सौजन्य – istock)
किरण पुरंदरे यांनी टिपलेल्या या छायाचित्रात पक्ष्याचे सौंदर्य अधिकच उठावदार दिसत आहे. पक्ष्याच्या डोक्यावर, पाठीवर, पंखांवर आणि शेपटीवर दवबिंदू किंवा पावसाचे जणू काही मोतीच जमा झाले आहेत, असे चित्र या छायाचित्रात दिसते. हिरव्यागार पानांच्या पार्श्वभूमीवर चमकणारे हे पाण्याचे थेंब आणि पक्ष्याचे टपोरे डोळे यांनी या छायाचित्राला एक वेगळीच कलात्मकता प्राप्त करून दिली. नागझिऱ्याच्या दाट जंगलात अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. मात्र, अशा दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन होणे हे एखाद्या भाग्यापेक्षा कमी नाही ते नागझिरा अभयारण्याच्या समृद्धतेचे प्रतीक आहे. अभयारण्यांमधील जैवविविधता टिकवून ठेवणे, ही काळाची गरज आहे.
निसर्गवेध संस्थेच्या या रोपवाटिकेने पक्ष्यांच्या अधिवासासाठी निर्माण केलेले सुरक्षित वातावरण आज एका दुर्मिळ छायाचित्राच्या निमित्ताने संपूर्ण जगासमोर आले आहे. हे छायाचित्र आता सोशल मीडिया आणि निसर्गप्रेमींच्या ग्रुप्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागझिरा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या उत्सुकतेतही यामुळे भर पडली.
विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट
पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिका ही ‘निसर्गवेध’ संस्थेच्या माध्यमातून चालविली जाते. या संस्थेने अत्यंत मेहनतीने या परिसराचे जतन व संवर्धन केले आहे. केवळ झाडे लावणेच नव्हे, तर स्थानिक परिसंस्थेला पोषक वातावरण निर्मिती करण्याचे काम या रोपवाटिकेच्या माध्यमातून केले जात आहे. म्हणूनच येथे पक्षी, फुलपाखरे आणि विविध प्राण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात बहरला आहे. किरण पुरंदरे यांचे या भागातील वास्तव्य आणि त्यांना मिळालेले हे दुर्मिळ दर्शन येथील पर्यावरणाच्या सुस्थितीची पावतीच आहे.