
टक्केवारीसाठी २६ कोटींची कामे थांबवली; भाजप शहराध्यक्ष अजितसिंह कव्हेकर यांचा सनसनाटी आरोप
Latur News: लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी डीपीडीसीमध्ये मंजूर केलेली शहर विकासाची २६ कोटींची कामे काँग्रेसच्या नगरसेवकांनी थांबविण्यामागे टक्केवारीचाच सोस दिसतो. काँग्रेसचे स्थानिक आ. अमितभैया देशमुख एकीकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात आणि दुसरीकडे मात्र महापालिकेत इशारा करून विकासकामे थांबवितात. असे भ्रष्टाचाराला पूरक असलेले विषय महापालिकेच्या पहिल्याच वार्षिक सर्वसाधारण सभेत आणतात या मागचे इंगीत केवळ सेटलमेंट हेच असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील-कव्हेकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला.
विषय शिल्लक असतानाच राष्ट्रगीताची घोषणा पत्रपरिषदेस मनपातील विरोधी पक्षनेते देविदास काळे, विरोधी गटनेते अॅड. दीपक मठपती, संजय गिरी, पंकज देशमुख, यादव उपस्थित होते. प्रारंभी विरोधी पक्षनेते देविदास काळे म्हणाले, डीपीडीसी फंडातून जी २६ कोटींची कामे मंजूर झाली त्यांच्या वर्क ऑर्डर सही निघाल्यात. तरीही केवळ टक्केवारीसाठी तो विषय थांबविण्यात आला. काँग्रेसला विकासाचा दृष्टिकोनच नाही. शिवाय कालच्या सभेत अजेंड्यावरील चार विषय चर्चेसाठी शिल्लक असतानाच राष्ट्रगीताची घोषणा करून सभा गुंडाळण्यात आली. याचा अर्थ काँग्रेस नेतृत्वाला अजिबात गांभीर्य नाही, असे काळे म्हणाले.
पाच हजार महिलांना मोफत सिटी बसचा लाभ
लातूर शहरातील सरसकट महिलांना मोफत सिटी बस सेवा देण्याच्या वारेमात घोषणा आ. देशमुख करीत असले तरी प्रत्यक्षात फक्त पाच हजार महिलांनाच या मोफत बससेवेचा लाभ मिळतो आहे, याकडे कव्हेकर यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. चाकूरकरांच्या स्मारकावरून श्रेय लाटण्याचा प्रयत्न दिवंगत लोकनेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक राज्य शासनातर्फे करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे केली होती.
आ. अमित देशमुख त्याचे क्रेडिट आपल्याकडे घेण्याचे काम करत आहेत, असे सांगून कव्हेकर म्हणाले, डॉ. आंबेडकर पार्कमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ फुटी पुतळ्याच्या कामाबाबत आ. देशमुख यांनी मागे विधानसभेत आक्षेप घेतला होता. एकाच आवारात डॉ. आंबेडकर यांचे दोन पुतळे कशाला, असा प्रश्न त्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. या ७५ फूट उंच पुतळ्याच्या कामालाही प्रारंभ झाला आहे. असे असताना आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम काँग्रेसवाले करीत आहेत.