कुंडलमध्ये रंगला कुस्त्याचा आखाडा; पंजाबच्या गौरव मच्छवाडाची महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीरवर मात
पलूस : पलूस तालुक्यातील कुंडल येथील झालेल्या ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर विरुद्ध गौरव मच्छवाडा (पंजाब) यांच्या लढतीत गौरव मछवारा याने 11 व्या मिनिटाला हर्षल सदगीर याला हफ्ता डावावर चितपट केले. अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या निकाली लढतीने कुस्ती शौकिनांनी एकच जल्लोष केला.
हेदेखील वाचा : Rushiraj Sawant Update: 68 लाखांचं बील अन् बाबा रागावतील म्हणून…; ऋषिराजसोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं?
पहिल्या क्रमांकासाठी हर्षल सदगीर विरुद्ध गौरव मछवारा यांच्यात लढत झाली. दुसऱ्या मिनिटाला हर्षलने पट घेत गौरवला खाली खेचले, पण त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दोन्ही मल्ल पट काढण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर ११ व्या मिनिटाला गौरवने हर्षलला हफ्ता डावावर चितपट करीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पंच म्हणून संतोष वेताळ यांनी काम पाहिले.
सनी मदने विरुद्ध नवीन कुमार यांच्या लढतीत सनी मदने घुटना डावावर विजयी झाला. ओंकार मदने विरुद्ध विनायक वाल्हेकर यांच्या कुस्तीत ओंकारने डंकी डावावर तिसऱ्या मिनिटाला विजय मिळवला. सतपाल शिंदे विरुद्ध अनिल बामणे यांच्या लढतीत सतपाल शिंदे तिसऱ्या मिनिटाला हफ्ता डावावर विजयी झाला. वैभव माने विरुद्ध महारुद्र काळेल, कार्तिक काटे विरुद्ध संदीप मोटे, भारत पवार विरुद्ध निकेतन कुस्ती झाली.
मैदानास खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी खासदार संजय पाटील, पै. चंद्रहार पाटील पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, जे. के. जाधव यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या. यावेळी आमदार अरुण आण्णा लाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब लाड, सर्जेराव पवार, बाळासाहेब पवार, दिग्विजय लाड यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते.
प्रिन्स कोहलीचा माऊली जमदाडेवर विजय
माऊली जमदाडे विरुद्ध प्रिन्स कोहली यांच्या लढतीत प्रिन्स कोहलीने चौथ्या मिनिटाला माऊलीवर घिस्सा डावावर विजय मिळवला. महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर यांच्या लढतीत महेंद्र गायकवाडने पूद्री डावावर दहाव्या मिनिटाला प्रकाश बनकर याला चितपट केले.
दादा शेळकेची आक्रमक खेळी
दादा शेळके विरुद्ध लल्लू जम्मू यांच्यातील कुस्ती 30 मिनिटांनी गुणावर लावण्यात आली. दादा शेळके याने आक्रमक होत दुसऱ्या मिनिटाला गुणांवर विजय मिळवला. रविराज चव्हाण विरुद्ध अभिनव नायक यांची कुस्ती प्रेक्षणीय झाली. प्रथम अभिनबने छडीटांग करत कुस्तीत रंगत आणली. हा डाव पलटवत रविराज चव्हाणने चौथ्या मिनिटाला एकेरी कसावर कुस्ती जिंकत कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
हेदेखील वाचा : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया 3-0 ने जिंकण्यासाठी सज्ज! भारताचा संघ कटकवरून अहमदाबादला दाखल… पाहा फोटो