
अतिवृष्टीग्रस्तांसाठी २६२ कोटींची मदत! शेतकऱ्यांना दिलासा; यवतमाळ जिल्ह्यासाठी ३० कोटी २ लाखांचा निधी मंजूर
Yavatmal News: जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीत संपूर्ण राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून, पुराचे पाणी शिरून जवळपास ३ लाख ९ हजार २८९ शेतकऱ्यांच्या २ लाख ६८ हजार ९१८.२९ हेक्टर शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. संदर्भात अतिवृष्टी व नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून वरिष्ठस्तरावर निधीबाबत मागणी करण्यात आली. दरम्यान २ ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २६२ कोटी ६९ लक्ष रूपयाचा निधी मंजूर केला. यात यवतमाळ जिल्ह्यासाठी ३० कोटी २ लाख ७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यावर्षी सुरूवातीला पाण्याने उघडीप दिल्यानंतर जुनच्या शेवटी व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात विविध भागांत शेतीचे मोठे नुकसान केले. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या आधारे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक, पुणे या सहा विभागासाठी २६५ कोटी ६९ लक्ष ९५ हजार रुपयाचा शासनाने नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर केला.(फोटो सौजन्य – AI)
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने निधी मंजूर केला असला, तरी प्रत्यक्ष मदत खात्यात जमा होण्याची प्रक्रिया आता महत्त्वाची ठरणार आहे. आधीच नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ही मदत वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासकीय मंजुरीनंतर निधी वितरणाची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, याकडे राज्यातील बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या सहा विभागांपैकी अमरावती विभागासाठी सर्वाधिक १८७ कोटी ४३ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विभागातील २ लाख १ हजार ८८३ शेतकऱ्यांचे २ लाख ८ हजार ९८३.०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख २७ हजार १८७ शेतकऱ्यांसाठी ११३ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील ३७ हजार १५ शेतकऱ्यांना ४४ कोटी २१ लाख रुपये, यवतमाळमधील ३७ हजार २९३ शेतकऱ्यांना ३० कोटी २ लाख रुपये, तर अकोला जिल्ह्यातील ३८८ शेतकऱ्यांसाठी २ कोटी ७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नागपूर विभागातील १७ हजार २२५ शेतकऱ्यांच्या १७ हजार ३८९.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी १५१ कोटी ७६ लाख नव्हे, तर १५१७.६९ लाख म्हणजेच १५ कोटी १७ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १० हजार ७९५ शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान नोंदविण्यात आले.
Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले
मंजूर मदतीचे वितरण थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात संकलित करून संगणकीय प्रणालीवर नोंदविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.