साहेब, तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही गावं सांभाळतो; जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांची भावना
इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : येत्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री जयंत पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याची शपथ शहरातील पदाधिकारी, बुथ अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. साहेब, तुम्ही राज्य सांभाळा. आम्ही गावं सांभाळतो, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शपथ घेतली.
हेदेखील वाचा : राज्यात अघोषित आणीबाणी…त्यांच्याबाबत काय बोलणार? कॉंग्रेस नेत्यांची तुफान राजकीय टोलेबाजी
जयंत पाटील म्हणाले, “मला मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न होतील. मात्र, माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे.” राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर शरदचंद्र पवार यांचे विश्वासू सहकारी जयंत पाटील राज्यभरामध्ये आपल्या पक्ष बांधणीसाठी दौरे करत आहेत. येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षासाठी काही नवीन चेहरे गळाला लागतील का? याची चाचपणी करण्यासाठी जयंत पाटील कार्यरत आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटाकडून दहापैकी आठ जागा विजयी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोठा वाटा होता. आता हीच विजयाची पताका पुन्हा विधानसभा निवडणुकीत फडकवण्यासाठी जयंत पाटील कामाला लागले आहेत. त्यामुळे आपल्या स्वतःच्या मतदारसंघांमध्ये त्यांना जास्त वेळ देता येत नाही. असे असले तरी जयंत पाटील फक्त निवडणुकीच्या तोंडावर नव्हे तर सतत मतदारसंघात मतदारांना भेटत असतात. मंत्री असो वा नसो जयंत पाटील यांच्या अवती-भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ नेहमीच असते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशासाठी जयंत पाटील करताहेत आखणी
सतत राज्यभरात दौरे, नवीन कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश,काही नेते-कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढणे, सत्ताधारी पक्षाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात सतत जयंत पाटील कार्यमग्न आहेत. राज्यभरामध्ये सर्वाधिक जागा मिळवून आपल्या राष्ट्रवादी पक्षाला यश कसे संपादन करता येईल. यासाठी जयंत पाटील आखणी करत आहेत. महाआघाडीला एकसंघ ठेवणे हे आव्हान पेलण्यासाठी जयंत पाटील पुढे असतात.
जयंत पाटील यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांची शपथ
ज्यांनी गेली सात वेळा जयंत पाटील यांना विधानसभेत पाठवले अशा मतदारांसमोर नेहमीच जयंत पाटील नतमस्तक होत असतात. आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर यश मिळवत असल्याचे ते नेहमीच सांगतात. आता राज्य सांभाळण्यासाठी जयंत पाटील साहेबांना मोकळीक देण्यासाठी त्यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांना राज्यात विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी शपथ घेतली आहे. हे शिवधनुष्य कसे पेलणार हे येणारा काळच सांगेल.
इस्लामपुरातील मतदान बुथवर विक्रमी मताधिक्य द्या
विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना विक्रमी मताधिक्य देणाऱ्या इस्लामपुरातील बुथना अनुक्रमे १ लाख व ५० हजाराचे बक्षिस जाहीर केले आहे. कृष्णेचे संचालक संजयकाका पाटील, व ‘राजारामबापू’चे संचालक शैलेश पाटील यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली.
हेदेखील वाचा : ‘आज देशाची आणि राज्याची स्थिती बिकट, सरकारला कष्टकऱ्यांची परवा नाही’; शरद पवार यांचा निशाणा