File Photo : NCP
कागल : आज देशाची आणि राज्याची स्थिती बिकट झाली आहे. केंद्र व राज्य शासनाला कष्टकऱ्यांची परवा नाही. आज शेतकरी उद्धवस्त झालेला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे लोक संतापाने रस्त्यावर उतरत आहेत. अशा लोकांचे खच्चीकरण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम शिंदे सरकार करत आहे. अशा सरकारला त्यांची जागा दाखवून राज्यात नव्याने नेतृत्वाची फळी उभा करून सत्ता काबीज करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी व्यक्त केला.
ऐतिहासिक गैबी चौकात भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी झालेल्या विराट सभेत शरद पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, ‘मोदी सरकार आणि शिंदे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. या सरकारच्या धोरणामुळे शेतीही उध्वस्त झालेली आहे. सन २००४ मध्ये कृषी मंत्री असताना शेती विकासाबाबतची धोरणे आखली. जो देश बाहेरून गहू-तांदूळ आयात करीत होता. तोच देश त्यावेळी जगात गहू आणि तांदूळ निर्माण करणारा आघाडीचा देश बनला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे कष्ट महत्वाचे होते’.
तसेच ‘आज सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे शेतीचे उत्पन्न घटले आहे. शेतीमालाला किंमत नाही. त्यामुळे बाहेरून अन्नधान्य घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साखर उत्पादनात भारत जगात दोन नंबरवर आहे. आणि राज्यात एक नंबर वर आहे. तर कोल्हापूर जिल्हा साखर उत्पादनात आघाडीवर आहे. याचं कारण देशात उत्कृष्ट कारखाने आहेत. त्यात कागलचा शाहू साखर कारखाना सर्वोत्कृष्ट चालविला आहे. असे असले तरी सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे साखरेची स्थिती गंभीर आहे’.
इथेनॉल निर्मितीवर मोदी सरकारने आणली बंदी
इथेनॉल निर्मितीवर देखील मोदी सरकारने बंदी आणली. सर्वच क्षेत्रात राज्यकर्त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे ते नाकर्ते बनले आहेत. मालवण प्रकरणावर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याच्या वेगाने पडला, असे मुख्यमंत्री शिंदे सांगतात. परंतु, मुंबई येथील सागरा जवळ असणारा शिवरायांचा पुतळा एक वर्षे उभा असून, देखील तो पडलेला नाही. हे स्पष्ट करून अशा सरकारला बाजूला सारून आपले राज्य निर्माण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.