
Mumbai Crime News, Shinde Sena Workers, Election Campaign Violence,
Eknath Shinde News: राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, प्रचारसभांचा धडाका सुरू आहे, राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे दिवसेंदिवस वातावरण तापू लागले आहे. मुंबईत ठाकरे बंधू विरूद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. या सगळ्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांनीसह पक्षाच्या झेंड्यांनीही मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. मारहाण करणाऱ्या शिंदे गटाच्या ८-१० कार्यकर्त्यांच्या विरोधात मध्यरात्री HMB पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार. सोमवारी (५ जानेवारी) शिंदे गटाचे कार्यकर्ते दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचारासाठी गेले होते. शिंदे गटाच्या उमेदवार रेखा राम यादव यांच्या प्रचार फेरीदरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्ते दहिसर विठ्ठलवाडी सोसायटीजवळ असलेल्या एका घरात प्रचार करण्यासाठी गेले असता, घरातील सदस्यांनी घरात प्रचार करण्यास विरोध केला. त्याचा रागातून शिंदे गटाच्या ८-१० कार्यकर्त्यांनी त्या घरातील सदस्यांनाच मारहाण केली.
मुंबईतील दहिसर परिसरात निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे काही कार्यकर्ते एका घरात प्रचारासाठी गेले असता तिथे त्यांना विरोध करण्यात आला. यानंतर प्रचार करणारे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्या घरातील दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरणाची दखल घेत एम.एच.बी. पोलिसांनी रात्री शिवसेना शिंदे गटाच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींची धरपकड सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ऐन निवडणूक प्रचाराच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रचाराच्या नावाखाली होणारी गुंडगिरी लोकशाहीसाठी घातक असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “निवडणूक होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांची अशी दादागिरी असेल, तर भविष्यात काय होणार?” असा सवाल दहिसरमधील नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे.
Sonia Gandhi: सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल
सोलापुरात दोन-तीन दिवसांपूर्वी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात रक्ताचा सडा पडल्याची धक्कादायक घटना घडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षात झाले असून, मनसेच्या एका तरुण पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने भाजप कार्यालयावर हल्ला चढवत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
बाळासाहेब सरवदे यांच्या घरातील महिला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांचा पत्ता कट करत विरोधी उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्याने वादाला तोंड फुटले. याच कारणावरून गेल्या दोन दिवसांपासून जोशी गल्ली परिसरात दोन गटांमध्ये सतत खटके उडत होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीदरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याच दरम्यान बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.