केबलचे कनेक्शन जोडत असतानाच बसला विजेचा जोरदार झटका; जागीच झाला मृत्यू
शिरोली : नागाव (ता.हातकणंगले) येथे केबलचे कनेक्शन जोडत असताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी अकराच्या सुमारास घडली. अतुल तानाजी कदम (वय ३०, रा. माळवाडी, नागाव) असे तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अतुल कदम हा एका चॅनेलच्या केबल कनेक्शनची कामे करत शिरोली औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला होता. शुक्रवारी सकाळी नागाव येथील एका मेडिकलच्या गोडावूनजवळ बांधकाम सुरू आहे, त्याठिकाणी केबल कनेक्शन काढून दुसरीकडे बदलत असताना त्या इमारतीवरून जाणाऱ्या 11 केव्हीच्या फीडरच्या विद्युत तारेला चॅनलच्या केबलचा स्पर्श झाला. त्यामुळे अतुल कदम या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : पोर्शे अपघात प्रकरणात सरकारी वकिलांची मोठी माहिती; अजय तावरेनेच ‘तो’ कट रचल्याचे पुरावे…
अतुल कदम याला पुलाची शिरोली येथील खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे नेण्यात आला. या होतकरू मुलाचा आकस्मित मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अतुल होता अविवाहित
अतुल कदम हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. दोन वर्षांपासून नागाव ग्रामपंचायतीने इमारतीवरील फीडरची केबल हलवण्यासाठी महावितरणशी पत्रव्यवहार केला होता. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे हा मृत्यू झाल्याने महावितरण विरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यूॉ
तीन वर्षीय चिमुकलीचाही मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, शिरोली येथे घरात खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलीला कूलरमधून विजेचा जोरदार झटका लागला. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झमकोली (ता. भिवापूर) येथे शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. उन्नती अर्जुन बोटरे (वय ३) असे बालिकेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण गाव हळहळून गेले आहे.