डंपरच्या धडकेत मुस्ती येथील तीन मजुर ठार (संग्रहित फोटो)
पुणे : राज्यात अपघाताच्या घटना वाढत असून, दररोज वेगवेगळ्या भागातून घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे- सोलापूर महामार्गावरील कदमवाक वस्तीजवळ भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केाला आहे.
सुरेश विठ्ठल कांबळे (वय ३३, रा. पांढरे मळा, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक एकनाथ नवनाथ चोरमोले (वय २३, रा. खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विठ्ठल लक्ष्मण कांबळे (वय ३३) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सुरेश हे बुधवारी (४ जून) रात्री कामावर निघाले होते. त्या वेळी पुणे-सोलापूर रस्त्यावर कदमवाक वस्ती परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार सुरेश यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेश यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाेचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारण समोर
डंपरने धडक दिल्यामुळे तरुणाचा मृत्यू
विरुद्ध दिशेने आलेल्या (राँग साईड) भरधाव डंपरने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येरवडा भागातील शास्त्रीनगर ते गुंजन चित्रपटगृह रस्त्यावर रविवारी हा अपघात घडला आहे. याप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर आलमयार खान (वय ३१, रा. निओ सिटी, बकोरी फाटा, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक अमिल रामसिरीठ सिंग (वय ४६, रा. शास्त्रीनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आत्ता यार खान (वय ३४, रा. निओ सिटी, बकोरी फाटा, वाघोली, नगर रस्ता) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.