पाटबंधारे खात्याचा मुंडण करून निषेध, युवा सेनेचे बंधाऱ्यावर आंदोलन
अकलुज : माळशिरस तालुक्यातील निरा नदीवरील गणेशगांव येथील बंधारा गेली अनेक वर्ष झाले वाहून गेला होता. तो बंधारा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त न केल्यामुळे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व गणेशगांव ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली मुंडण आंदोलन करण्यात आले. गेली अनेक वर्ष निरा नदीवरील गणेशगांव येथील बंधारा पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला होता. त्याचवेळी युवा सेनेच्या वतीने याच बंधाऱ्यावर जलसमाधी आंदोलन, जनांक्रोश आंदोलन, हलगी नाद आंदोलन केले होते. यावेळी बंधारा तात्काळ दुरुस्त करून देण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु बंधारा आजतागायत दुरुस्त केलेला नाही. गणेशगांव बंधारा माळशिरस आणि इंदापूर तालुक्याला जोडलेला आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे दळणवळण जास्त प्रमाणात आहे.
बंधारा तत्काळ दुरुस्त करावा
शाळकरी मुलांना गेली अनेक वर्ष नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेता बंधारा तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेना युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व गणेशगांवमधील ग्रामस्थांच्या वतीने बंधाऱ्यावरती मुंडन आंदोलन केले. यावेळी पाटबंधारे मंत्री व पाटबंधारे अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
पाटबंधारे कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा इशारा
गणेशगांव येथील बंधाऱ्याचे काम आठ दिवसात सुरू करावे. अन्यथा पंढरपूर येथील पाटबंधारे कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल, इशारा युवा सेनेच्या व शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.