राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारणार; शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर यांनी घेतला पुढाकार
मुंबई : खासगी व शहरी शाळांप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्या तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनात राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पीएम श्री योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री शाळा योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
केंद्र सरकारने सरकारी शाळांसाठी पीएम श्री योजना सुरू केली आहे. राज्यात 2022-23 पासून ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेवर केंद्र व राज्य शासनाकडून 60:40 या प्रमाणे खर्च केला जात आहे. या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात 516 व दुसऱ्या टप्पयामध्ये 311 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने पीएम श्री प्रमाणेच सीएम श्री योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे.
राज्यात वर्तमान स्थितीमध्ये 4860 केंद्र शाळा आहेत. या केंद्र शाळांतर्गत येणाऱ्या प्रत्येकी एका शाळेची निवड सीएम श्री साठी करण्याचे प्रस्तावित आहे. सीएम श्री साठी निवड झालेल्या एका शाळेत सर्व भौतिक व मानवी संसाधनाच्या दृष्टीने सुसज्ज, अशी इतर शाळांना आदर्श ठरणारी शाळा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी जास्त विधार्थी संख्या, भौतिक सुविधांच्या विकासासाठी जागेची उपलब्धता, समर्पित शिक्षकांची उपलब्धता, समाजाचा सक्रीय सहभाग इत्यादी निकष निश्चित करण्याचे प्रस्तावित आहे.
उत्तम प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार
या शाळांमधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी उत्तम प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहे. प्रत्येक शाळेतील विकासाच्या गरजा विचारात घेऊन त्यानुसार आराखडा तयार करण्यात येणार आहे.
शाळांचे रूपडे पालटणार
शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना शिक्षण क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. बालकांच्या शिक्षणाचा पाया प्राथमिक शिक्षण असल्याने त्यांनी पुढाकार घेत प्राथमिक शिक्षणातील पायाभूत सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी व शेतमजूर असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण गावातच मिळावे, हा यामागचा दृष्टीकोन आहे.
3556 शाळांचा राहणार समावेश
सीएम श्री योजनेमध्ये एकूण 4860 केंद्र शाळांचा समावेश प्रस्तावित आहे. परंतु, पीएम श्री येजनेत 827 व आदर्श शाळा योतनेत 477 शाळांचा समावेश असल्याने या शाळा वगळून उर्वरित 3556 शाळांचा सीएम श्री मध्ये समावेश राहणार आहे.
प्रत्येक शाळेसाठी 4 कोटींचा निधी
प्रत्येक शाळेसाठी संभावित 4 कोटी रूपयांचा निधी गृहित धरण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेवर अंदाजित 14224 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या खर्चात आवर्ती व अनावर्ती खर्चाचा समावेश आहे. अनावर्ती खर्चामध्ये भौतिक सुविधा ज्यामध्ये वर्ग खोल्या, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सोलर पॅनल, ग्रंथालय, अटल टिंगरीग लॅब, डिजीटल क्लास रूमचा समावेश आहे.