kiran mane press conference
मुंबई : स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याने सिने अभिनेते किरण माने (Kiran Mane Press Conference) यांनी आज पत्रकार परिषद घेत पॅनोरमा एंटरटेनमेंटवर (Panorama Entertainment) आरोप केले आहेत. तसेच त्यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. त्यांचे वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी आज त्यांची भूमिका मांडली आहे.
पॅनोरमा कंपनीने पाच कोटींची नुकसान भरपाई द्यावी, लेखी पद्धतीने माफी मागावी, पुन्हा सन्मानाने काम करण्यासाठी आमंत्रित केलं पाहिजे तरच हे प्रकरण मिटेल अन्यथा पुढची न्यायालयीन लढाई लढू , असा इशारा किरण माने यांनी प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात असलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
[read_also content=”न्यायव्यवस्थेला ‘संजीवनी’ कधी मिळणार ? डीआरएटीच्या नियुक्त्यांमधील विलंबाबाबत उच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-high-coart-asked-central-government-about-dart-post-selection-nrsr-232670.html”]
यावेळी बोलताना किरण माने म्हणाले की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे आणि जातीयवादामुळे माझ्यासोबत हा अन्याय झाला आहे. हा फिल्म इंडस्ट्रीतील जातीयतावादही आहे. पहिल्या दिवसापासून माझं एकचं मत आहे की मला काढण्या अगोदर मला नोटीस का देण्यात आली नाही? माझी बाजू का ऐकून घेतली नाही? हे मराठी अभिनेत्यासोबत असं होणे हे चुकीचं आहे. महिलांसोबत गैरवर्तन हा माझ्यावर आरोप आहे आणि हे मी मान्य करु शकत नाही. असा आरोप असेल तर मला आधीच का सांगितलं नाही ? हे सगळं नंतर का उकरुन काढण्यात आलं ? असा सवालही त्यांनी केला आहे.
किरण मानेंची कायदेशीर बाजू मांडताना वकील असीम सरोदे यांनी म्हटलं की, किरण माने यानिमित्तान एक निमित्त आहेत. त्यांना काढून टाकल्यावर गाजावाजा झाल्यावर कव्हर अप करण्यासाठी त्यांच्यावर महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना १३ तारीख असलेली नोटीस २१ तारखेला देण्यात आली आहे. ज्या दिवशी ते रात्री आणि दिवसापण शूट करत होते. हा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. पॅनोरमा एंटरटेनमेंट ही एजन्सी आता कायदेशीररित्या अडकली आहे. किरण मानेंची बदनामी, त्यांचा अपमान आणि स्त्रियांप्रती चुकीचं वागल्याची त्यांची एक चुकीची प्रतिक्रिया निर्माण करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास झाला आहे. यासाठी आता पॅनोरमा कंपनीने त्यांना पाच कोटींची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माने यांनी केली.