‘सर्वोत्कृष्ट निवेदक’चा पुरस्कार मिळाल्यानंतर समृद्धी केळकरची खास पोस्ट; म्हणाली, "स्पर्धक म्हणून सुरुवात केली होती त्याच..."
‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’मालिकेतून अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) महाराष्ट्रातल्या घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेली ‘किर्ती’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्ये तसेच ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत सुद्धा समृद्धीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने समृद्धी रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी समृद्धी फक्त उत्तम अभिनेत्री असून ती एक उत्तम होस्टही आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’मालिका संपल्यानंतर अभिनेत्री ‘मी होणार सुपरस्टार’शोची होस्टिंग करत आहे.
‘मी होणार सुपरस्टार’शोच्या होस्टिंगची जबाबदारी तिला मिळाल्यानंतर तिने अगदी लिलया ती सांभाळली. अभिनेत्रीला ‘मी होणार सुपरस्टार’शोच्या दमदार होस्टिंगसाठी ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’कडून ‘सर्वोत्कृष्ट निवेदक’चा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्रीने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने ‘स्टार प्रवाह’सह अनेकांचे आभार मानले.
समृद्धी केळकर पोस्टमध्ये काय म्हणाली ?
“मालिका संपल्यावर लगेच एका डान्स शो चं निवेदन करण्याची संधी खूप कमी जणांना मिळते… ती संधी मला मिळाली स्टार प्रवाहमुळे “मी होणार सुपरस्टार “साठी…. नृत्य हा माझा जिव्हाळ्याचा विषय… पण निवेदन म्हणजे कधीच न केलेली गोष्ट…. सुरुवातीला भयंकर टेंशन आणि धाकधूक… पण नॉन फिक्शनच्या अख्या टीमने खूप सपोर्ट केला, सांभाळून घेतलं आणि म्हणून मी माझं काम लीलया पार पाडू शकले… थँक्यू टीम प्रसाद क्षीरसागर, सुमेध म्हात्रे आणि @mild_and_classic ”
“ज्या रंगमंचावर स्पर्धक म्हणून सुरुवात केली होती त्याच रंगमंचावर निवेदन करून आज त्याचा पुरस्कार स्विकारतानाच्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत… आणि अर्थातच ह्या डान्स शोचे दोन्ही पर्व होस्ट करू शकले ते मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे, त्यांच्या प्रेमामुळे… थँक्यू सो मच असचं प्रेम कायम राहूद्यात. माझ्यावर विश्वास दाखवून एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलीत त्याबद्दल खूप खूप आभार…”
छोट्या पडद्यावरींल मालिकांशिवाय समृद्धीने (Samruddhi Kelkar ) ‘दोन कटींग’ या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलेलं आहे. ती सर्वात आधी २०१७ मध्ये रिॲलिटी शो ‘ढोलकीच्या तालावर’मध्ये झळकली होती. ती उत्तम नृत्यांगणा आहे. या शोच्या महाअंतिम फेरीपर्यंत समृद्धी पोहोचली होती.