फोटो सौजन्य - Social Media
चित्रपट, वेब शो आणि आता मालिका! अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारा आदिनाथ कोठारे छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. आतापर्यंत रुपेरी पडद्यावर दमदार प्रोजेक्ट्स, उल्लेखनीय भूमिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रभावी कामगिरी करून त्याने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता पहिल्यांदाच आदिनाथ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असून, त्याचा हा नवा प्रवास चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या नवीन मालिकेचं नाव आहे “नशीबवान”. या मालिकेत आदिनाथ फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर निर्माता म्हणूनही काम करत आहे. दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रांत आपली छाप सोडलेल्या आदिनाथसाठी ही मालिका एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. मालिकेत तो रुद्रप्रताप घोरपडे ही प्रभावी आणि ठसठशीत व्यक्तिरेखा साकारणार असून, त्याच्या या भूमिकेची चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
या नव्या प्रवासाविषयी आदिनाथ सांगतो, “आजवर मी अनेक मालिकांसाठी निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे, पण अभिनेता म्हणून हा माझा पहिला अनुभव आहे. चित्रपट आणि ओटीटीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करणं वेगळं असतं, पण मालिकेच्या माध्यमातून रोज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचण्याची भावना खरंच अनोखी आहे. माझ्या कारकिर्दीतली ही पहिली सीरियल असली तरी मालिकेच्या मागचं कामकाज मी अनेकदा अनुभवलेलं आहे. मात्र आता अभिनेता म्हणून या प्रवासाचा भाग होण्याची संधी मिळणं हे खूप खास आहे. माझ्या नशिबाने दिलेली ही एक अनमोल आणि ‘नशीबवान’ संधी आहे असं मी नक्कीच म्हणेन.”
आदिनाथ कोठारे हा सध्याच्या पिढीतील सर्वाधिक बहुप्रतिभावान कलाकारांपैकी एक मानला जातो. विविध वेब शोमधून त्याने प्रेक्षकांचं मन जिंकत ओटीटी माध्यमात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आता तो मालिकेच्या माध्यमातून अभिनय साकारताना दिसणार असल्याने प्रेक्षकांसाठी हा नवा प्रवास नक्कीच रोमांचक ठरणार आहे.
सध्या आदिनाथ तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे न थांबता मनोरंजन करताना दिसत आहे. मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांतही त्याची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावरचा त्याचा डेब्यू, त्याचं निर्माता-अभिनेता म्हणूनचं दुहेरी योगदान आणि प्रेक्षकांना दररोज भेटण्याचा अनुभव! हे सगळं मिळून “नशीबवान” ही मालिका प्रेक्षकांसाठी एक नवा आणि वेगळा अनुभव ठरणार यात शंका नाही.