बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 4) १०० दिवसांचा प्रवास रविवारी संपला. या बिग बॉसच्या घरात १९ सदस्य एका ट्रॉफीसाठी लढले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. पण महविजेता एकच असणार आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो.
बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये सदस्य १०० दिवस अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहात होता, महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता मिळाला. अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता तर अपूर्वा नेमळेकरने उपविजेती ठरली आहे. विजेत्या अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार इतकी रक्कम, ट्रॉफी आणि पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर देण्यात आले.
अक्षय केळकरची पहिली प्रतिक्रिया
खिलाडूवृत्ती, टास्कमधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या पर्वाचा विजेता ठरला. विजेतेपद पटकावल्यानंतर अक्षय म्हणाला की, आज फक्त प्रेक्षकांमुळे मी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरलोय. मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. मी माझे लक्ष्यदेखील पूर्ण केले. त्याबद्दल मी प्रेक्षकांचे, कलर्स मराठीचे, महेश मांजरेकर, घरातील सर्व सदस्यांचे, बिग बॉसच्या बॅकस्टेज टीमचे सर्वांचेच आभार. आय लव्ह यू, मी फक्त तुमचाच आहे. फार मजा आली. कमाल गेम आणि आई-पप्पा धन्यवाद.