नाट्यरसिकांसाठी नाटकांची मेजवानी, वेगवेगळ्या धाटणीची नाटकं येणार प्रेक्षकांच्या भेटीला...
मराठी रंगभूमीवर सर्वोत्तम नाटके येत नाहीत, नामवंत कलाकारांचा सहभाग नसतो, प्रेक्षक नाटकाकडे फिरकत नाहीत असा तगादा आता कोणा प्रेक्षकाला लावता येणार नाही. कारण प्रत्येक महिन्याला एक, दोन नाटकाची निर्मिती होत असते परंतु आता भविष्यात सात नाटके ही व्यावसायिक रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झालेले आहेत. यातल्या ‘वजनदार’ या नाटकाची तारीख निश्चित झालेली आहे. ‘ॲनिमल’, ‘७ बेलवलकर’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘ह्यांचं काही खरं नाही!’, ‘मामला करोडचा’, ‘करायचं प्रेम तर मनापासून’ ही नाटके लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
कोरोनापासून जगभरातल्या प्रेक्षकांची सुटका झाली असली तरी पुढे काही महिने तरी चिंता व्यक्त करावी असे वातावरण काही महिने संपूर्ण जगात होते होते. विशेषतः मनोरंजनाच्या बाबतीत काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण या कलेवरती कितीतरी कलाकार, तंत्रज्ञ या अवलंबून होते. त्यामुळे पूर्वीसारखे चांगले दिवस येतील का अशा विवंचनेत नाही म्हटले तरी दोन वर्ष ही प्रेक्षकांनी घालवलेली आहेत. आता प्रेक्षकांनी, अनेक कलाकार, तंत्रज्ञांनी समाधान व्यक्त करावे अशी गोष्ट कलेच्या सर्वच बाबतीत होताना दिसते आहे. चित्रपट, नाटक, मालिका इतकेच काय तर वेब सिरीजची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे. हे जरी खरे असले तरी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचे सर्वात जास्त लक्ष कुठे वेधले जात असेल तर ते मराठी नाटकाकडे सांगता येईल.
गेल्या काही महिन्यातल्या मराठी नाटकाचा इतिहास तपासून पाहिला तर रंगभूमीचे निष्ठा, बांधिलकी असलेले कलाकार आपल्या पद्धतीने रंगभूमीला वेळ देत होते. परंतु रंगमंचाकडे आपले पणाने आणि अपुलकीने पाहणाऱ्या कितीतरी कलाकारांना केवळ स्वीकारलेली जबाबदारी आणि दिलेला शब्द या गोष्टीमुळे नाटकाला काही वेळ देता येत नव्हते परंतु गेल्या एक महिन्यात मराठी रंगभूमीने आनंद व्यक्त करावा अशी गोष्ट नाट्यसृष्टीत होताना दिसते आहे. ‘भूमिका’ या नाटकाच्या निमित्ताने सचिन खेडेकर हे रंगमंचावर दाखल झालेले आहेत तर ‘वजनदार’ या नाटकाच्या निमित्ताने अलका कुबल रंगमंचावर दाखल होणार आहे. तब्बल २७ वर्षानंतर त्या रंगमंचावर येणार आहेत. महेश मांजरेकर हे ‘कॉफी फिल्टर’ या नाटकाच्या निमित्ताने लेखक दिग्दर्शक म्हणून बऱ्याच वर्षानंतर पुन्हा रंगमंचाच्या सेवेत रुजू झालेले आहेत. एकंदरीत काय तर ‘नाव ठेवायला जागा’ नाही अशा सगळ्या गोष्टी मराठी रंगभूमीवर होताना दिसत आहेत. आता प्रतीक्षा आहे ती प्रेक्षकांची. हाऊसफुल्लची गर्दी करून या नव्या येणाऱ्या नाटकाला दात द्यायला हवी या नव्या नाटकांनंतर आणखीन सात नाटके हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता फक्त घोषणा केली त्यामुळे भविष्यात तुमच्या आवडीचा कलाकार या नाटकात असण्याची शक्यता आहे.
भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट; म्हणाली, ‘कदाचित, मी तो दिवस बदलू शकले असते तर…’
सिद्धार्थचा ‘ॲनिमल’
निर्मिती संस्था, दिग्दर्शक, लेखक यांची नावे पाहिल्यानंतर मराठी रंगभूमी वरती प्रेक्षक खुष होतील अशी नाटके रंगमंचावर येत आहेत. यात महेश मांजरेकर लिखित, दिग्दर्शित ‘ॲनिमल’ हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर येणार आहे. प्रत्येक माणसात दडलेला एक जनावर… ही त्याची टॅग लाईन आहे. विशेष म्हणजे आजवर अभिनेता सिद्धार्थ जाधवने चित्रपट, मालिका काही रियालिटी शोचे सूत्रसंचालन यांना प्राधान्य देताना अधून मधून नाटकात काम करण्याला प्राधान्य दिले आहे. पण या नाटकाच्या निमित्ताने तो निर्मितीच्या क्षेत्रात येतो आहे. तारा राम प्रोडक्शन आणि अश्विनी थिएटरच्या वतीने या नव्या नाटकाची निर्मिती केली जाणार आहे. अर्थात त्यात मुख्य भूमिकेत तोही सहभागी असण्याची शक्यता आहे. रॉयल थेटर आणि ती गोवा हिंदू असोशियनच्या कला विभागाने आजवर अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. विशेष संगीत नाटकाची निर्मिती करण्यात या संस्थेचा मोठा वाटा राहिलेला आहे. आता अरविंद औंधे यांच्या लेखनात आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शन एक रोमँटिक कॉमेडी म्हणावी असे नाटक रंगमंचावर दाखल होत आहे. ‘करायचं प्रेम तर मनापासून’ हे या नाटकाचे नाव आहे. ‘मामला करोडचा’ हेही नाटक रंगमंचावर दाखल होत आहे. गजानन मिस्त्री यांनी लेखनाबरोबर निर्मिती केलेली आहे. संध्या चैतन्य ही या नाटकाची सहलेखिका आहे. शेखर दाते हे या नाटकाचे सूत्रधार असणार आहेत.
सविता दामोदर परांजपे
गाजलेल्या नाटकावर कोण्या निर्मात्याला चित्रपट निर्मिती करावीशी वाटते यावरून त्या नाटकाची त्यावेळीची लोकप्रियता काय आहे याची कल्पना येते. काही दशकापूर्वी शेखर ताम्हणे लिखित आणि राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर आले होते. रीमा लागू यांची यात मुख्य भूमिका होती. नाटकाला जी लोकप्रियता मिळाली ती मात्र हा चित्रपटाला मिळाली नाही. ऑल टाइम क्लासिक म्हणावे असे हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ही नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राजनने स्वीकारलेली आहे. निरंजन ताम्हाणे, मैत्रीय रेसबोड, आलाप मोहिते हे या नाटकाची निर्मिती करणार आहे. त्रिकूट प्रस्तुत, मॅनमेकर्स मीडियाची ही निर्मिती असणार आहे. ‘ह्यांचं काही खरं नाही!’ हे नाटक लवकरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाल तांबे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन विशाल आणि दीपेश हे दोघे एकत्र येऊन करणार आहे. याचबरोबर ‘७ बेलवलकर’ याही नाटकाची घोषणा झालेली आहे. सत्योम फिनिक्स प्रोडक्शन आणि व्ही. आर. प्रोडक्शन्स यांचीही निर्मिती आहे. या दोन्ही नाटकात कलाकार कोण अद्याप ठरलेले नाही परंतु ही नाटके रंगमंचावर येतात हे मात्र नक्की.