anita date
स्मिता मांजरेकर, मुंबई :‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची कल्पना वेगळी आहे. मी साडेचार वर्षे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका केली. त्याच्यामध्ये राधिका ज्या पद्धतीने दाखवली होती. त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असं मनामध्ये होतं आणि या भूमिकेची ऑफर येताच काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने ही भूमिका स्विकारली. कुठल्याही कलाकाराला वेगवेगळ्या भूमिकेतून पुढे यावं असं वाटत असतं. ही भूमिका त्याच पठडीतील आहे. यात करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. एक तर ही भूमिका फोटोफ्रेममधून बोलणार आहे. जे व्यक्ती अस्तित्वात नाही, जिवंत नाही. ते जिवंतपणे साकारण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच प्रत्येक स्त्रिला तिचं घर आवडत असतं. तिची माणसं आवडत असतात आणि आपण नेहमी बाईला म्हणतो, जीव गुंतला आहे का त्यात? काय वरती घेऊन जाणार आहे ? बाईचा जीव संसारात , पतीमध्ये नेहमी गुंतलेला असतो. आता जीव त्यात गुंतला आहे म्हणजे नेमकं काय झालंय, तर ते या निमित्ताने साकारायला मिळणार आहे. कधीच कोणी कल्पनाही करू शकत नाही आणि करणारही नाही असं पात्र साकारण्याची संधी मिळतेय. खरंतर या मालिकेत मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं निधन झालंय, पण ती फोटोफ्रेमध्ये जिवंत होऊन आपल्या नवऱ्याशी संवाद साधते. अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. यापूर्वी अशी भूमिका केलेली नाही. ही टिपिकल भूमिका नाही. नेहमीचा सासू-सूनेचा ड्रामा यात नाही.
भूमिकेचं आव्हान…
फ्रेममधून बोलणं काही अवघड नाही. ते सहज आहे. फक्त इथे देहबोलीतून प्रतिक्रिया देता येत नाही. एका चौकटीत काम करावं लागतंय. अशी भूमिका करणं म्हणजे आव्हानच आहे. कमीत कमी साधनामधून जास्तीत जास्त गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि मलाही उत्सुकता आहे की, मी हे कसं साकार करणार आहे ? त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी एक आव्हान आहे.
प्रिया तेंडुलकरांच्या भूमिकेशी साधर्म्य
प्रिया तेंडुलकर यांनी ‘हम पाँच’ मालिकेमध्ये अशी भूमिका साकारली होती. मी ती मालिका पाहिली नव्हती. पण अर्थातच त्याचा ग्राफ माझ्यासमोर आहे. पण हे ते नाही. त्यापेक्षा वेगळं काहीतरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे ‘हम पाँच’ नक्की नाहीए. या मालिकेत पल्लवी पाटील आहे. सगळ्यांची लाडकी साऐशा आहे. कौस्तुब परुळेकर आहे. हे सगळे कलाकार मंडळी आहेत म्हटल्यावर अर्थातच ही मालिका खूपच मजेशीर असणार. तसंच अभिनेता कश्यप परुळेकरने आजवर अनेक मालिका केलेल्या आहेत. त्यामुळे तो लोकांपर्यंत आधीच पोहोचलेला आहेत आणि किर्ती मेहेंदळे खूप वर्षांनी मालिकेत काम करणार आहे. त्यामुळे एक वेगळी कलावंतांची भट्टी जमली आहे. तसंच कोरोनामुळे सगळे थोडेसे उदास झाले होते. आता आयुष्यात मजा आणण्याचं काम ही मालिका करेल.
‘लव्ह लावणी’बद्दल
मी ‘लव्ह लावणी’ नावाचा नवा कार्यक्रम घेऊन येत आहे. २८ जुलैला त्याचा शुभारंभचा प्रयोग होत आहे. ‘लव्ह लावणी’ हा कार्यक्रम लावणी सम्राज्ञींवर आधारीत आहे. ज्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे, अशा शकुंतलाबाई नगरकर आणि त्यांच्या काही साथीदारांवर हा कार्यक्रम आधारीत आहे. त्यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या लावण्या सादर केल्या. वेगवेगळ्या कार्यक्रमात लावणी सादर करून ही कला देशाच्या कानाकोपऱ्यात नेली. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा या कार्यक्रमात घेण्यात येतोय. हा कार्यक्रम एका लावणी कलाकाराची गोष्ट सांगत रंगत आणतो. ही एक वेगळी कल्पना आहे. कारण सर्वसाधारणपणे आपण नेहमी पाहतो की लावणी कार्यक्रमात नव्या-जुन्या लावण्या सादर केल्या जातात. यात केवळ लावणीचा कार्यक्रम असतो आणि निवेदनानं तो जोडला जातो. पण कधीही या लोकांबद्दल माहिती देणारा कार्यक्रम कुठेही झालेला नाही. तो या निमित्ताने होणार आहे.
माझा सहभाग
मी यात ज्येष्ठ लावणी कलावंत शबाना अष्टुकर यांची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट अर्थातच एका व्यक्तीची नाही तर ती संपूर्ण लावणी कलावंतांची गोष्ट आहे. त्यांचं आयुष्य किती प्रयोगशील आहे? एक स्त्री म्हणून त्यांचं आयुष्य किती पुढारलेलं आहे? तसंच खऱ्या अर्थाने आपण समाज म्हणून त्यांच्याकडे कसं पाहतो ? हे दाखवणारा हा कार्यक्रम आहे. ही अत्यंत स्त्रीप्रधान गोष्ट आहे आणि ती साकारण्याचं काम मी करणार आहे.
संशोधन
लेखक भूषण कोरगांवकर यांनी ‘लव्ह लावणी’चं संशोधन आणि लेखन केलंय. त्यांनी या संदर्भात काही कार्यक्रमही केले आहेत. त्यांच्याकडे ‘संगीत बारी’चा दांडगा अनुभव आहे तसंच या लावणी कलावंतांशी बातचीत करून त्यांनी संशोधन केलंय. पंधरा वर्षे संशोधन केल्यानंतर त्यांनी सगळं लिखाण केलेलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमातून अनेक सत्य गोष्टी बाहेर पडतील. अनेकदा कार्यक्रमातून असं होतं की, चित्रफीतीमधून या सगळ्या कलाकारांना दाखवलं जातं आणि आपल्याला हवं तसं रंगवलं जातं. पण खऱ्या गोष्टी नेमक्या काय आहेत ? हे कोणाला माहितच नसतं. त्यामुळे या कार्यक्रमातून लावणी कलावंतांनी सांगितलेली गोष्ट पुढे येणार आहे. म्हणजे स्वत:च्या मनाने काही गोष्टी सांगत नाही. तर या कलावंतांना सोबत घेऊन हे संशोधन केलेलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला एक दर्जा प्राप्त झाला आहे आणि हे काम उत्तमरित्या भूषण कोरगांवकरनं केलेलं आहे. तसंच या कार्यक्रमातून लावणीसुद्धा सादर करण्यात येणार आहे आणि तेसुद्धा लावणी कलावंतं स्वत:च सादर करणार आहेत म्हणजे शकुंतला नगरकर ज्या उत्तम लावणी नृत्यांगना आहेत. त्या या कार्यक्रमाच्या भाग आहेत आणि त्या त्यांच्या गाजलेल्या, अत्यंत प्रसिध्द झालेल्या लावण्या सादर करणार आहेत. घाशीराम कोतवालमधली ‘नेसले पितांबरी जरी’ ही अत्यंत प्रसिद्ध लावणी त्या सादर करणार आहेत. अनेक वेगवेगळ्या लावण्या आहेत ज्या गोष्टीला अनुसरून असतील. पण एका कलावंतांची गोष्ट सांगणं हे
यात प्रामुख्याने असेल आणि अत्यंत वेगळा समाज, वेगळ्या कलावंतांची कहाणी इथे उलगडून दाखवण्यात येईल. जिथे स्त्रियांना अधिक महत्त्व आहे असं कोणतंही क्षेत्र आपल्याकडे नाही. माझंही क्षेत्र असं नाही. मी मालिकेत काम करते. पण इथे पुरुषांना अधिक महत्त्वं आहे असे अनेक व्यावसायिक क्षेत्र आहेत. जिथे पुरुषांना महत्त्व दिलं जातं. पण इथे तसं नाही. इथे स्त्रिला महत्त्वं आहे. त्यामुळे साहजिकच हे क्षेत्र अधिकच सक्षम क्षेत्र आहे आणि ही महाराष्ट्राची ही एक परंपरा आहे आणि त्यामुळे त्यांची कहाणी सांगावीशी वाटते, त्याच्याबद्दल बोलावसं वाटतं आणि सादर करावसं वाटतं.
‘लव्ह लावणी’ची सुरुवात
मी भूषण कोरगांवकर यांचा ‘संगीत बारी’ कार्यक्रम पाहिला होता. ‘संगीत बारी’ कार्यक्रमाची मी खूप मोठी फॅन आहे आणि एक दिवस भूषण यांनी मला ‘लव्ह लावणी’बद्दल सांगितलं. मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिका या स्त्रीप्रधान आहेत आणि त्यातील माझी इमेज लक्षात घेता, मी हे चांगल्या पध्दतीने साकारू शकले असा त्यांचा विश्वास होता. त्याप्रमाणे त्यांनी मला याची संकल्पना सांगितली आणि मी लगेच होकार दिला. मी आणि संभाजी सासणे ज्यांनी सध्या ‘बी.ई बेरोजगार’ ही वेबसीरिज केलीय. आम्ही दोघं मिळून ‘लव्ह लावणी’ सादर करणार आहोत.