कीर्तनाच्या माध्यमातून ह. भ. प. अश्विनी महाराज टाव्हरे करणार पर्यावरणाचा जागर
कीर्तनातून रंजन करता-करता डोळ्यांत अंजन घालण्याची किमया कीर्तनकार पार पाडीत असतात. आपल्या कृतीतून,वाणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचं काम सातत्याने कीर्तनकार करीत असतात.
पारंपारिक पद्धतीने पार पडणार इंद्रायणी अधोक्षजचा लग्नसोहळा, गोपाळ- इंदूच्या नात्यात अनपेक्षित वळणं
ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे बारामती, पुणे इथल्या इंग्रजी माध्यमात शिक्षिका म्हणून काम करीत असतानाच महिला कीर्तनकार म्हणून नावारूपाला आल्या. अध्यात्माचा आणि पर्यावरणाचा सुवर्णमध्य साधून ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांचा चालू असलेला प्रवास अविश्वसनीय आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना पर्यावरणासाठी काही तरी करावं, या उद्देशानं त्या ज्या-ज्या खेडेगावात कीर्तनासाठी जातात तिथं-तिथं एक रोप लावत आणि त्या रोपाची काळजी घेण्याची जबाबदारी तिथल्या गावकऱ्यांवर सोपवतात. पुन्हा त्याच ठिकाणाहून कीर्तनाचं निमंत्रण आल्यावर दिलेल्या रोपाची योग्य ती निगराणी राखली जाते का, त्याची काळजी घेतली जाते का… हे पाहूनच त्या कीर्तनाला होकार किंवा नकार देतात.
आपल्या या कृतीतून पर्यावरणशिक्षणाची एक चळवळ त्यांनी निर्माण केली आहे. ‘आजूबाजूला अनेक नकारात्मक गोष्टी घडत असल्या तरी त्यांतील सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करून त्यांना प्रकाशझोतात आणण्याचं काम मला महत्त्वाचं वाटतं, ‘ असं ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे म्हणतात. ‘माझ्या कीर्तनातून समाजाला आदर्शांकडे नेण्याचा माझा प्रयत्न आहे.’ असं त्या सांगतात. परिवर्तनाचा प्रयत्न करत आपल्या धरणीमातेला, निसर्गाला, पर्यावरणाला समृद्ध करण्याचा त्यांचा संकल्प त्यांना वेगळं ठरवतो.
येत्या ५ जूनला ‘पर्यावरण दिन’ आहे. या दिनाचं औचित्य साधत त्यांच्या कीर्तन सादरीकरणाचा विशेष भाग ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या रिअॅलिटी शोमध्ये रंगणार आहे. या शोमध्ये ह. भ. प. अश्विनी महाराज टाव्हरे आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकतील.
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो सोमवार ते शनिवार, सकाळी ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवरून प्रसारित होत आहे.