
फोटो सौजन्य - Social Media
स्टीलच्या डब्यांचा आवाज, कूलरची घरघर, विजेच्या बिलाबाबत सतर्क असलेले पप्पा आणि जेवणाच्या टेबलवर रंगणारे हलकेफुलके वाद अशा परिचित वातावरणासह मिश्रा कुटुंब नव्या सीझनमध्ये परतणार आहे. बदलत्या काळानुसार घरात वाय-फाय, नवीन रंगरंगोटी आणि आधुनिकतेचा स्पर्श दिसणार असला तरी घरातील आपुलकी आणि भावनिक जिव्हाळा कायम तसाच राहणार आहे.
या सीझनमध्ये अन्नू स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसणार असून त्याच्या महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासातील संघर्षही दाखवला जाणार आहे. अमन शांत स्वभावात परतला असला तरी त्याच्याकडेही काही गुपितं दडलेली असतील. तर “बिट्टू की मम्मी” म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली शांती अचानक चर्चेचा विषय बनते आणि त्या प्रसिद्धीचा आनंद घेताना दिसते.
या नव्या पर्वाबद्दल बोलताना Vijay Koshy यांनी सांगितले की, “प्रत्येक सीझनसोबत गुल्लक प्रेक्षकांच्या अधिक जवळ पोहोचत गेली आहे. मिश्रा कुटुंब हे प्रत्येक मध्यमवर्गीय घराचं प्रतिबिंब वाटतं. पाचव्या सीझनमध्ये बदलत्या भारताचं वास्तव दाखवतानाच मालिकेची भावनिक ऊब आणि साधेपणा कायम ठेवण्यात आला आहे.”
अभिनेत्री Geetanjali Kulkarni म्हणाल्या, “शांती ही नेहमीच कुटुंबाचा भावनिक आधार राहिली आहे. मात्र यावेळी बदलत्या जगाशी जुळवून घेणारी तिची वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल.” The Viral Fever निर्मित या मालिकेत Jameel Khan, Geetanjali Kulkarni, Harsh Mayar, Sunita Rajwar, Helly Shah आणि Vaibhav Raj Gupta यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हास्य, भावनिक क्षण आणि घरगुती नात्यांची ऊब अनुभवण्यासाठी Gullak चा पाचवा सीझन ५ जूनपासून फक्त Sony LIV वर पाहता येणार आहे.