(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सत्य घटनांनी प्रेरित ‘अरण्य’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. संघर्षमय जीवनाची झुंज, नक्षलवादाने उद्ध्वस्त होत चाललेले आयुष्य, नात्यांमधील गुंतागुंत आणि जंगलातील धडकी भरवणारा वास्तव संघर्ष या ट्रेलरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. केवळ थरारक कथा नव्हे तर बाप-लेकीच्या नात्याची भावनिक गुंफण प्रेक्षकांच्या काळजाला भिडेल, अशी झलक ट्रेलरमध्ये दिसत आहे.
विशेष म्हणजे हा चित्रपट गडचिरोलीच्या खऱ्या जंगलात प्रत्यक्ष चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला अस्सलतेचा स्पर्श लाभला आहे. स्थानिक विदर्भी लहेजा, जंगलातील वास्तव दृश्ये आणि स्थानिक वातावरणामुळे चित्रपटाला जिवंतपणा आला असून प्रेक्षकांना हा अनुभव केवळ पडद्यावरचा सिनेमा न वाटता, प्रत्यक्ष जंगलात जगलेला प्रवास वाटेल.
‘ओरडू नका…’ उच्च न्यायालयात एकमेकांना भिडले करिश्मा आणि प्रियाचे वकील, इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल
दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात, ” ‘अरण्य’ ही केवळ नक्षलवादावरची गोष्ट नाही, तर ही जंगलात जगणाऱ्या सामान्य माणसाची, त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या नात्यांची गोष्ट आहे. आम्ही हा चित्रपट करताना कोणतीही कृत्रिमता ठेवली नाही. गडचिरोलीच्या दाट जंगलात प्रत्यक्ष शूट केल्यामुळे या चित्रपटाला एक अस्सल गंध मिळाला आहे.
कलाकारांनीही या वातावरणाशी स्वतःला एकरूप केलं. ‘अरण्य’चं वेगळेपण म्हणजे ही कथा सत्य घटनांनी प्रेरित आहे. ही केवळ थरारक नाही तर हृदयाला चटका लावणारीही आहे. यात नातेसंबंध आहेत, आशा आहे, आणि एक वेदना आहे. हा सिनेमा पाहाताना प्रेक्षकांना केवळ एक कथा दिसणार नाही, तर त्यांना जंगलाचा श्वास, त्यातील धडकी भरवणारा संघर्ष आणि नात्यांची उब जाणवेल.”
निर्माते शरद पाटील म्हणाले, ” ‘अरण्य’ हा आमच्यासाठी एक जाणीव आहे. आम्हाला सुरुवातीपासून हे माहीत होतं की ‘अरण्य’चा प्रवास सोपा नाही, कारण जंगलात प्रत्यक्ष शूट करणं ही एक मोठी धाडसाची गोष्ट आहे. परंतु त्यातूनच या सिनेमाला खरी ताकद मिळाली. या चित्रपटात सत्य, भावनिकता आणि थरार एकत्र गुंफला गेला आहे. मला खात्री आहे की, हा अनुभव प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील. सत्य घटनांनी प्रेरित ही कहाणी आणि जंगलातील थरारक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळा आणि लक्षात राहणारा सिनेमॅटिक अनुभव देईल.”
एस. एस. स्टुडिओ आणि एक्स्पो प्रस्तुत, अदिक फिल्म्सच्या साहाय्याने, अमोल दिगांबर करंबे लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका असून, निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील आहेत. येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.