
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्लसवरील नव्या मालिकांपैकी ‘शहजादी है तू दिल की’ सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. कार्तिक आणि दीपा यांच्या नात्याचा प्रवास अनुभवताना प्रेक्षक या कथेत अधिकाधिक गुंतत चालले आहेत. अशातच स्टार प्लसने ‘शहजादे शहजादी ले जायेंगे’ या खास भागाचा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित केला असून, त्याने आधीच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणले आहे.
या प्रोमोमध्ये अंगद, कृष्णा आणि सचिन हे तिघेही गुप्तहेरांच्या हटके अंदाजात एकत्र येताना दिसतात. हृदयाच्या आकाराचे गॉगल्स आणि गुलाबांच्या बंदुका हातात घेऊन ते दीपाच्या मनात कार्तिकसाठी प्रेम जागवण्याच्या खास मिशनवर निघालेले पाहायला मिळतात. या विशेष भागात स्टार प्लसच्या विविध लोकप्रिय मालिकांमधील जोड्या एकत्र येणार आहेत. ‘माना के हम यार नहीं’ मधील खुशी–कृष्णा, ‘उड़ने की आशा’ मधील सचिन–साईली, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मधील अंगद–वृंदा, ‘शहजादी है तू दिल की’ मधील कार्तिक–दीपा आणि ‘तोड़ कर दिल मेरा’ मधील राज–रौशनी हे सर्व पात्र एकाच भागात झळकणार आहेत.
या खास भागातून कार्तिक आणि दीपा यांची प्रेमकथा नव्या वळणावर येणार असून, हे दोघे एकमेकांसाठीच कसे बनले आहेत यावर प्रकाश टाकला जाणार आहे. जरी त्यांना स्वतःला आपल्या भावनांची जाणीव नसली, तरी विविध मालिकांतील जोड्या खेळ, मस्ती आणि मजेशीर प्रसंगांमधून एकच ध्येय साध्य करताना दिसणार आहेत—दीपाच्या हृदयात कार्तिकसाठी प्रेम जागवणे. या मजेशीर आणि रोमँटिक लव्ह मिशनमध्ये पुढे काय घडणार, कार्तिक–दीपाला त्यांच्या खऱ्या भावना कधी उमगणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘शहजादे शहजादी ले जायेंगे’ हा खास भाग प्रेक्षकांना एक तास पाहता येणार आहे.