अलीकडेच बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळत होती. डिसेंबरमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या या अभिनेत्याचे निधन झाल्याची इंटरनेटवर अफवा पसरली होती. या खोट्या बातमीवर आता श्रेयसने प्रतिक्रिया दिली आहे. श्रेयसने एक लांबलचक नोट लिहून पोस्ट शेअर केली आहे की, तो जिवंत आहे आणि त्याच्या मृत्यूची बातमी चुकीची आहे. चुकीच्या बातम्यांबद्दल निराशा व्यक्त करताना, अभिनेता म्हणाला की विनोद महत्त्वपूर्ण असला तरी त्याचा गैरवापर धोकादायक असू शकतो. तो म्हणाला की, ‘जे विनोद म्हणून सुरू झाले ते आता माझ्या कुटुंबाला अनावश्यक ताण आणि तणाव देत आहे.’ असे अभिनेत्याने या शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिलेले आहे.
श्रेयसच्या घरच्यांना वाटली काळजी
श्रेयसने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले की, “मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. मी मेल्याचा दावा करणारी पोस्ट पाहिली. मला माहित आहे की विनोदाला त्याचे स्थान आहे, परंतु जेव्हा त्याचा गैरवापर होतो तेव्हा ते हानिकारक असू शकते. कोणीतरी गंमत म्हणून सुरुवात केली असेल पण त्यामुळे माझ्या कुटुंबाला नाहक त्रास झाला. हे त्यांच्या भावनांशी खेळत आहे.” असं तो म्हणाला.
मुलगी विचारते प्रश्न
अभिनेता श्रेयसने पुढे लिहिले की, “माझी धाकटी मुलगी जी रोज शाळेत जाते ती माझ्या तब्येतीची खूप काळजी करते. ती मला विचारत राहते की मी ठीक आहे का. या खोट्या बातम्या तिला अधिक दुःखी करतात आणि तिला अधिक प्रश्न विचारण्यास भाग पाडतात. जे हा प्रकार पसरवत आहेत त्यांनी हे थांबवावे. त्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होईल याचा विचार करा. काही लोक माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतात आणि हा विनोद हृदयद्रावक आहे.” असं त्याने या शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले असून, त्याने हे अफवा पसरवण्याराला संदेश दिला आहे.
हे देखील वाचा- करीना कपूर खानचा ‘द बकिंघम मर्डर्स’चे नवीन पोस्टर रिलीज, लवकरच येणार जबरदस्त टीझर!
अभिनेता श्रेयस तळपदेला ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्याला ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आता अभिनेत्याची तब्येत एकदम ठणठणीत आहे. आणि आता लवकरच तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातून त्यांच्या भेटीस येणार आहे.