
फोटो सौजन्य - Social Media
सुप्रसिद्ध Karisma Kapoor हिचे दिवंगत माजी पती Sanjay Kapur यांच्या तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून सध्या मोठा कौटुंबिक संघर्ष सुरू झाला आहे. संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची आई रानी कपूर आणि पत्नी प्रिया कपूर यांच्यात मालमत्तेच्या हक्कावरून वाद निर्माण झाला असून हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात इंग्लंडमध्ये पोलो सामना खेळताना संजय कपूर यांचे निधन झाले होते. त्यानंतर कपूर कुटुंबातील अंतर्गत वाद सतत चर्चेचा विषय ठरत आहेत.
या वादात रानी कपूर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत रघुवंशी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (RIPL) च्या १८ मे रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीवर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला यांनी “हे प्रकरण इतकं मोठं आहे की महाभारतही त्यापुढे लहान वाटेल,” अशी टिप्पणी करत प्रकरणाच्या गंभीरतेकडे लक्ष वेधले. न्यायालयाने या खटल्याची पुढील सुनावणी १४ मे रोजी होणार असल्याचेही स्पष्ट केले.
रानी कपूर यांच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, ७ मे रोजी सुप्रीम कोर्टाने सर्व संबंधित पक्षांना मध्यस्थीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतर लगेचच RIPL कडून १८ मे रोजी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत नवीन स्वतंत्र संचालकांची नियुक्ती आणि बँक खात्यांच्या अधिकृत स्वाक्षरीधारकांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव असल्याचे समोर आले आहे.
रानी कपूर यांच्या मते, कंपनीवरील नियंत्रण मिळवण्यासाठी हा प्रयत्न केला जात असून तो न्यायालयीन मध्यस्थी प्रक्रियेच्या विरोधात आहे. दुसरीकडे RIPL च्या वकिलांनी हे सर्व निर्णय RBI च्या नियमांनुसार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, २०१७ मध्ये बनावट आणि फसव्या कागदपत्रांच्या आधारे RK Family Trust स्थापन करून कुटुंबाची मालमत्ता त्या ट्रस्टच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचा गंभीर आरोपही रानी कपूर यांनी केला आहे.
रानी कपूर यांनी स्वतःला दिवंगत उद्योगपती सुरिंदर कपूर यांच्या संपत्तीची एकमेव वारसदार असल्याचा दावा केला आहे. सुरिंदर कपूर हे ‘सोना ग्रुप ऑफ कंपनीज’सह अनेक उद्योगांचे प्रमुख होते. मात्र त्यांच्या मालमत्तेचे हस्तांतरण फॅमिली ट्रस्टकडे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कपूर कुटुंबातील वाद अधिकच चिघळले असून बॉलिवूडसह उद्योगविश्वाचे लक्ष आता या खटल्याकडे लागले आहे.