de dhakka 2
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘दे धक्का’ हा चित्रपट आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यातले अनेक संवाद लोकांच्या आठवणीत आहेत. या चित्रपटाच्या पुढच्या भागाची म्हणजेच ‘दे धक्का २’ची (De Dhakka 2) सगळे आतुरतेने वाट बघत होते. नुकताच ‘दे धक्का २’ (De Dhakka 2) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सुद्धा जाधव कुटुंबियांची धमाल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. फक्त यावेळी फरक इतकाच आहे की ‘दे धक्का २’ चं कथानक (De Dhakka 2 Trailer Out) हे लंडनमध्ये घडणार असल्याने राणीच्या देशात मराठमोळ्या जाधव कुटुंबाला काय अनुभव येतात, हे लोकांना पाहता येणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मराठी माणूस म्हणून हिणवणाऱ्या गोऱ्या माणसांना जाधव फॅमिली ठणकावून सांगते की, मराठी माणसाला कधी कमी लेखू नका म्हणजेच ‘नेव्हर अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ मराठी माणूस’. मराठी संस्कृती आणि मराठी माणूस याविषयी या चित्रपटामध्ये बरंच काही बघायला मिळणार आहे.
[read_also content=”पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका करण्यासाठी सज्ज – धनश्री काडगांवकर https://www.navarashtra.com/entertainment/dhanshri-kadgaonkar-interview-about-her-role-in-tu-chal-pudhe-serial-nrsr-306216/”]
जाधव कुटुंबावर आलेलं संकट आणि त्या संकटाला ते कसं दे धक्का म्हणत पुढे लोटतात हे सिनेमात पाहता येईल. दे धक्काच्या पहिल्या भागात धनाजीने आणलेली टमटम सगळ्यांच्या लक्षात आहे. यावेळी पण त्यांच्या एका गाडीतला प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलर बघितल्यानंतर मकरंद जाधव आणि त्याची बायको सुमती, मुलगी सायली, मुलगा किस्ना, जावई धनाजी, हेमल्या आणि तात्या यांच्या या अनोख्या सफरीचा अनुभव घ्यावा ही भावना लोकांच्या मनात आल्याशिवाय राहात नाही. महेश मांजरेकरांचीही भूमिका चित्रपटामध्ये दिसत आहे. ‘दे धक्का’ चित्रपटातील सर्व कलाकार ‘दे धक्का २’ मध्येही दिसून येणार आहेत. मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संतोष खापरे, सिद्धार्थ जाधव अशी तगडी स्टारकास्ट यात बघायला मिळणार आहे. फक्त यात सायलीची भूमिका गौरी इंगवले करत आहे.
‘दे धक्का’चा पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यामुळे दुसऱ्या भागातही तशीच धमाल पाहायला मिळणार का ? याचं उत्तर मात्र ५ ऑगस्टला चित्रपट रिलीज झाल्यानंतरच मिळू शकेल.