पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं आहेगेल्या १५ दिवसांपासून (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) विक्रम गोखले मृत्यूशी झुंज देत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
[read_also content=”‘तुझ्यासारखा कलावंत आणि माणूस होणे नाही’, नाना पाटेकर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट https://www.navarashtra.com/movies/nana-patekars-post-for-vikram-gokhale-nrsr-348603.html”]
दिलीप प्रभावळकर म्हणाले, “ज्याची भीती होती तेच झालं. त्याच्या आजाराविषयी मला माहिती होतं. मला वाटलं होतं त्यातून तो बरा होईल, पुन्हा आम्ही भेटू. तो माझा खूप जवळचा मित्र होता. त्याला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला. आम्ही फार भाग्यवान आहोत की आम्हाला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय याचा त्रिवेणी संगम ‘बॅरीस्टर’ या नाटकाच्या माध्यमातून बघता आला. जयवंत दळवी यांचं लेखन, विजय मेहता यांचं दिग्दर्शन आणि विक्रम गोखले यांची अप्रतिम भूमिका म्हणजे आमच्यासाठी एक मोठा वस्तूपाठ होता. विक्रम हा नुसता अभिनेता नव्हता, ती एक अभिनयाची संस्था होती. विजय केंकरे यांच्या ‘अप्पा आणि बाप्पा’ या नाटकात मला विक्रमबरोबर काम करायची संधी मिळाली. त्याचा स्टेजवरील वावर, वाचिक अभिनयावरील हुकूमत, शिस्त, भाषा, उच्चार हे सगळं मी एक सहकलाकार म्हणून फार जवळून पाहिलं आहे. अशा नटाबरोबर रंगमंचावर एकत्र काम करणं हा फार आनंददायी अनुभव होता. मराठी नाट्यसृष्टीत विक्रमपेक्षा चांगलं मराठी बोलणारा नट शोधून सापडणार नाही असं मला वाटतं. तो आणि त्याचे वडील पुढील पिढीला प्रशिक्षण देण्यात पुढे असायचे शिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यातसुद्धा ते कायम तत्पर होते.”
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली होती. ही त्यांनी काम केलेली अखेरची मालिका होती.