Crime News Live Updates
22 Aug 2025 01:42 PM (IST)
बंडगार्डन परिसरात चारचाकी वाहनचालकाने निष्काळजीपणे गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीवरून जात असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा अपघात झाल्याची घटना घडली. याअपघातात महिलेच्या डाव्या हाताची दोन बोटे फॅक्चर झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, सीमा संतोष करडे (वय ३८, पोलिस अंमलदार, लष्कर पोलिस स्टेशन, पुणे) या दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमधील व्यक्तीने चारचाकीचा दरवाजा अचानक उघडला. दरवाजा त्यांच्या डाव्या हातावर आपटला. यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी व त्यालगतचे बोट फ्रॅक्चर झाले. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 Aug 2025 01:22 PM (IST)
उरळी देवाची येथील मंतरवाडी कचरा डेपोसमोर झोपलेल्या वाहन चालकाचा विचीत्ररित्या झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वाहनांच्यामध्ये झोपल्यानंतर टेम्पो पाठिमागे घेताना त्याच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच त्याची माहिती न देता पसार झाला. गणेश ज्ञानेश्वर जाधव (वय ३१, रा. सटलवाडी, ता. पुरंदर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 Aug 2025 01:03 PM (IST)
पुण्यातून एक चोरीसंदर्भात बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवासी महिलेला मदतीचा बहाणा करून तिच्या बॅगेतील सोन्याच्या बांगड्या, अंगठी चोरून पसार झालेल्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. चोरट्याचे पुणे आणि मिरज रेल्वे स्थानकात प्रवाशांकडील ऐवज चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून ११० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रमेश उर्फ मोटा पिता फूलचंद (रा. न्यू अनाज मंडी, नजफगड, दिल्ली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहायक निरीक्षक प्रभाकर कापुरे, उपनिरीक्षक सुनील माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
22 Aug 2025 12:45 PM (IST)
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. बनावट सोने खरे असल्याचे भासवून ते सराफ व्यवसायिकांना देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे, त्यांच्याकडून काळेपडळ, चंदनगर, पर्वती आणि आंबेगाव अशा चार पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा छडा लागला आहे. तर तीन लाख रुपयांची रोकड, एक लाख रुपय किंमतीचे मोबाईल चार लाख रुपये किंमतीचे हॉलमार्क असलेले बनावट दागिने असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहीत संजय गोरे (वय ३०, रा. धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय २८), ओम सुंदर खरात (वय २३, रा.दोघे वडगावबुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. तर त्यांना बनाट सोन्याचे दागिने पुरविणाऱ्या मुंबईच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वाहीद पठाण व त्यांच्या पथकाने केली आहे.
22 Aug 2025 12:25 PM (IST)
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर ऐन सणासुदीत संक्रात आणली असून, लोणीकाळभोर, कोंढवा तसेच वानवडी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्ड़वरील तब्बल दहा सराईत गुन्हेगारांवर एकाचवेळी तडीपारीची कारवाई केली आहे. त्यांना शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिक्षेत्रातून तडीपार केले आहे. त्यात टोळीप्रमुख व सदस्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिले आहेत. आगामी काळातील सण- उत्सव तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रतिबंधक आळा घालण्याच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत गुलाब यादव (वय. २२ रा. कदमवाकवस्ती लोणीकाळभोर), प्रसाद उर्फ बाबु धनाजी सोनवणे (वय. २१, रा. थेऊर), विश्वजित भिमराव गायकवाड (वय. ४०, रा. कोंढवा खुर्द), टोळीप्रमुख करीम सय्यदअली सौदागर उर्फ लाला (वय. २९), शाहरुख रमजान पठाण उर्फ फतेह (वय. २५), अझहर बशीर शेख (वय. ३५), अझहर इरफान सदस्य उर्फ अज्जु (वय. २८,राहणार सर्व कोंढवा परिसर), टोळीप्रमुख राहूल उर्फ विकी रामु परदेशी (वय.३५), विशाल राजू सोनकर (वय.२६), सुनिल रामू परदेशी (वय. ३०, राहणार सर्व वानवडी गाव) अशी या आरोपींची नावे आहेत.
22 Aug 2025 12:05 PM (IST)
माळेगाव शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि चौकांमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अपघातांची संख्या वाढत असल्याने आणि वाहतुकीत सतत अडथळे निर्माण होत असल्याने माळेगाव पोलिसांनी सरळ आक्रमक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. केवळ एका दिवसात तब्बल ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करून बेशिस्त वाहनधारकांना चपराक लगावण्यात आली आहे. निरा-बारामती रोड, आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, शिवाजी चौक हे माळेगावातील वाहतुकीचे मुख्य केंद्र आहेत. परंतु या ठिकाणी वाहनधारकांकडून बेशिस्त पद्धतीने पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. पादचारी मार्गांवर उभ्या केलेल्या दुचाक्या, चौकांमध्ये लावलेल्या चारचाकी यामुळे अपघात आणि नागरिकांचा त्रास वाढत चालला होता.
22 Aug 2025 11:49 AM (IST)
शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी पुण्यातील दोघांची तब्बल ५० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने चोरटे फसवणूक करत आहेत. फसवणुकीचे सत्र सातत्याने सुरूच असल्याचे देखील यावरून दिसत असून, पोलिसांकडून जनजागृती केली जात असताना नागरिक या आमिषांना बळी पडत असल्याचेही दिसत आहे.
सध्या पावसाळी पर्यटनासाठी मित्र कंपनी, कुटुंबीय आणि वेगवेगळे ग्रुप्स निसर्सरम्य ठिकाणी जात आहेत. पुणे जिल्हा हाही पर्यटनासाठी प्रसिद्ध असून सिंहगड किल्ला आणि परिसरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. त्यातच, पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळून एक पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथे हवा पॉइंटजवळील खोल दरीत पाय घसरून पडल्याने पर्यटक बेपत्ता झाला असून घटनास्थळी प्रशासन व पोलीस कर्मचारी पोहोचले आहेत. गौतम गायकवाड (वय 24) असे बेपत्ता तरुणाचे नाव असून त्याच्यासाठी शोधमोहिम राबवली जात आहे. गौतम हा हैदराबादवरुन मित्रांसमवेत पर्यटनास आला होता.