प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर-२' ९ ऑस्टपासून प्रदर्शित होणार; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!
स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आयुष्यातील प्रवासाची झलक दाखवणारा ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर, प्रेक्षकांच्या मनावर देखील गारुड केले होते. या चित्रपटाला तुफान यश मिळाल्यानंतर आता ‘धर्मवीर’चा सिक्वेल ‘धर्मवीर-२’ येत्या ९ ऑस्टपासून प्रदर्शित होणार आहे.
मराठी, हिंदी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार
विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेते बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थित लॉन्च करण्यात आले आहे. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहचलेली उत्सुकता लवकरच संपणार आहे.
नोव्हेंबरमध्ये झाले होते चित्रीकरण सुरू
“धर्मवीर – २” या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून, महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते.
गाजवणार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
दरम्यान, ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली दिघे साहेबांची भूमिका जबरदस्त होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. याच धर्तीवर आता ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘धर्मवीर-२’ हा देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल यात शंकाच नाही.