फोटो सौजन्य - Social Media
आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्रमैत्रिणी भेटतात. काही नातं आयुष्यभर टिकतं तर काही क्षणभरात विरतं. खरी मैत्री मात्र शेवटपर्यंत सोबत राहते. अशाच खरी मैत्रीची कहाणी सांगणारा तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित नवीन मराठी चित्रपट ‘जब्राट’ नववर्षारंभी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं दमदार पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘जब्राट’ हा तरुणाईला भावणारा संगीतमय आणि रंगतदार चित्रपट आहे. लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स असा भरपूर मनोरंजनाचा मसाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तरुण प्रेक्षकांसाठी हा चित्रपट खास पर्वणी ठरणार आहे.
या चित्रपटात आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट आणि दिग्दर्शिका प्रगती कोळगे ही तरुण फळी झळकणार आहे. या नव्या चेहऱ्यांसोबतच अनुभवी कलाकारांचीही मोठी फळी आहे. त्यात संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांसारखी ज्येष्ठ नावं प्रेक्षकांना वेगळा आनंद देतील.
निर्मितीची जबाबदारी अनिल अरोरा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे यांनी सांभाळली आहे. छायांकन अनिकेत खंडागळे यांचं असून सहाय्यक दिग्दर्शनाची सूत्रं चार्लेस गोम्स यांच्याकडे आहेत. चित्रपटाच्या नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी ‘लावणी किंग’ म्हणून ओळखले जाणारे आशिष पाटील यांनी पार पाडली आहे. वेशभूषा युगेशा ओमकार यांची असून चित्रपटाला नेत्रसुखद लुक देण्यात आला आहे.
संगीत हा या चित्रपटाचा मोठा आकर्षणबिंदू आहे. डॉ. जयभीम शिंदे यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी ताकदीने सांभाळली आहे. चित्रपटात प्रेमगीते, प्रेरणादायी गाणी आणि लोकगीतांचा देखील सुरेल संगम घडवण्यात आला आहे. या गीतांना आवाज दिला आहे बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमाप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर आणि स्वाती शिंदे यांसारख्या लोकप्रिय गायकगायिकांनी. तरुणाईच्या मैत्री, प्रेम आणि उत्साहाला उजाळा देणारा ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांसमोर येत असून नव्या वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट एक धमाल मेजवानी ठरणार आहे.