प्रतिक्षा संपली! संजय लीला भन्साळींच्या बहु़चर्चित 'लव्ह अँड वॉर'च्या शुटिंगला या दिवशी होणार सुरुवात?
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच चित्रपटाची स्टारकास्ट समोर आली होती. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत बॉलिवूडमधलं त्रिकुट दिसणार आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट (Alia Bhat) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता अशातच लवकरच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘ॲनिमल’नंतर रणबीर कपूरच्या प्रसिद्धीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीर ‘रामायण’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र होता. आता त्या चित्रपटाचं सर्व शुटिंग संपलं असून रणबीर त्याच्या अपकमिंग चित्रपटाच्या शुटिंगसाठी सज्ज झाला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या शुटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. या पीरियड ड्रामा चित्रपटासाठी दिग्दर्शकांनी मुंबईतल्या फिल्म सिटीतील ५ स्टुडिओमध्ये सेट उभारण्याचे काम सुरू केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या ७ नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दिग्दर्शक ह्या चित्रपटाचा सेट ऐतिहासिक पद्धतीने डिझाईन करणार आहेत. संजय लीला भन्साळी नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे आजवर जितके चित्रपट रिलीज झाले आहेत, तितक्या चित्रपटातील सेट्सची जोरदार चर्चा झाली आहे. संजय लीला भन्साळी कायमच चित्रपटांतील भव्यता आणि छोट्या छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेतात. आता ‘लव्ह अँड वॉर’मध्येही प्रेक्षकांना काय हटके पाहायला मिळणार ? यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. मिड डेने दिलेल्या माहितीनुसार, ‘लव्ह अँड वॉर’चा ओपनिंग सीनच खूप भव्य दिव्य असणार आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर ५० एक्स्ट्रा सह- कलाकारांसोबत दिसणार आहे.
यामध्ये, रणबीर कपूर सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं कथानक एका युद्धाच्या कथानकावर बनवला जाणार आहे. त्यामुळे चित्रपटातले सीन्स खरे वाटावे, यासाठी दिग्दर्शक विशेष मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. चित्रपटातले एकूण एक सीन्स कशापद्धतीने दिसतील, याकडेही भन्साळी लक्ष देत आहेत. चित्रपटाच्या शुटिंगच्या सुरूवातीच्या दिवसांत रणबीर कपूर एकटाच शुटिंग करेल. त्यानंतर पुढच्या आठवड्यात विकी कौशलही चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करेल. डिसेंबरमध्ये आलिया भट्टही चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपट २०२६ मध्येच रिलीज होण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत तारीख समोर आलेली नाही.
दिग्दर्शक भन्साळी यांनी ‘लव्ह अँड वॉर’ची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. चित्रपटाबद्दलची माहितीही त्यांनी अजूनही गुपितच ठेवली आहे. सध्या बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक फिल्म सेटवर ‘नो फोन पॉलिसी’ लागू करताना पाहायला मिळत आहे. त्याप्रमाणे भन्साळी सुद्धा ही पॉलिसी राबवण्याची शक्यता आहे. शिवाय, दिग्दर्शक चित्रपटाच्या सेटवर येण्यासाठी मोजक्याच लोकांना परवानगी देणार असल्याचीही माहिती मिळत आहे. दिग्दर्शक लवकरच रणबीर कपूर, आलिया भट आणि विकी कौशल या तिघांचेही टीझर पोस्टर रिलीज करू शकतात, अशी माहितीही मिळाली आहे. यामध्ये तिघांचीही चित्रपटातील पहिली झलक पाहायला मिळेल.