‘रानटी’ चित्रपटात प्रेक्षकांना काय काय पाहायला मिळणार ? स्वत: दिग्दर्शकांनीच सांगितलं
काही कलाकारांमुळे प्रेक्षकांचं चित्रपटाकडे लक्ष वेधलं जातं, तर काही दिग्दर्शकांमुळे. दिग्दर्शक समित कक्कड हे आजच्या घडीला फिल्म इंडस्ट्रीतील एक असं नाव बनलं आहे, ज्याची कलाकृती म्हणजे नावीन्यपूर्ण विषयाची जणू खात्रीच. आजवरच्या आपल्या कामाने आणि अनोख्या सादरीकरणाने समितनं रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. कायम वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देणारे समित कक्कड आता ‘रानटी’ हा मराठीतला मोठा ॲक्शनपट घेऊन आले आहेत. नुकताच त्यांनी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना सांगितले आहे.
हे देखील वाचा – शाहरुख खानला भेटला जबरा फॅन; ९५ दिवस वाट पाहिल्यानंतर चाहत्यांची अखेर इच्छा पूर्ण!
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध नायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनी या चित्रपटाचा दमदार टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता. या टीझरला अल्पावधीतच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा ॲक्शनपट येत्या २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटात काय काय दिसणार याची माहिती दिली आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल ॲक्शन ‘रानटी’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अंगावर रोमांच आणणारे स्टंटस आता ‘रानटी’ ॲक्शपटात पहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक समित कक्कड यांनी स्वतः केला खुलासा
काही मोजके ॲक्शनपट सोडले तर ॲक्शन मसाल्यासाठी मराठी चित्रपटांचा प्रेक्षकही हिंदी चित्रपटांकडे वळतो. म्हणूनच एक नवीन प्रयोग आणि मराठी चित्रपटांच्या आशयाला ॲक्शनचा तडका देण्यासाठी मी ‘रानटी’ हा ॲक्शनपॅक्ड चित्रपट मराठीत घेऊन आल्याचं समित यांनी सांगितलं. यात ॲक्शन, रोमान्स, इमोशन, ड्रामा आहे. ‘हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक पॉवरफुल पॅकेज आहे, त्यामुळे मला खात्री आहे की, प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडेल.’ असा विश्वास समित कक्कड यांनी व्यक्त केला. कोणत्याही कथाविषयाचं बारकाईनं संशोधन करून मगच आपल्याला उमगलेलं चित्र पडद्यावर प्रभावीपणे सादर करायचं हे समित यांच्या यशाचं गमक असल्याचं त्याच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकल्यावर अगदी सहजपणे लक्षात येतं.
दिग्दर्शक समित कक्कड यांच्या कलाकृतीमध्ये कायम नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात, धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, ३६ गुण अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणाऱ्या आणि सादर करण्याची क्षमता असणाऱ्या दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपली गुणवत्ता जपण्याचा कायम प्रयत्न केला आहे.