"माझ्या महाराष्ट्राने बॉलिवूडला अनेकदा वाचवलंय...", महेश मांजरेकर 'छावा' चित्रपटाबद्दल जरा स्पष्टच बोलले
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मनं जिंकली आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला आहे. १४ फेब्रुवारीला रिलीज झालेला हा चित्रपट दोन महिन्यांपेक्षा अधिक दिवस बॉक्स ऑफिसवर टिकून राहिला आहे. दरम्यान, त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. मुख्य बाब म्हणजे, विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटालाही मागे टाकले आहे. दरम्यान, आता मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक- अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत ‘छावा’ चित्रपटाच्या यशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘मिर्ची मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी ‘छावा’ चित्रपट आणि विकी कौशलबद्दलचं मत व्यक्त केले आहे. मुलाखतीदरम्यान महेश मांजरेकर म्हणाले की, “विकी कौशल हा एक अप्रतिम कलाकार आहे. त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त चालला. ‘छावा’ चित्रपटाने जवळपास ८०० कोटींचा व्यवसाय केला. पण विकी कौशलने कधीच म्हणू नये की, प्रेक्षक मला पाहायला आले. कारण मग लोक आधीचे पाच चित्रपटदेखील पाहायला आले असते. ते तू साकारलेले पात्र पाहायला आले. त्याचे या आधीचे पाच चित्रपट चालले नव्हते.”
विखुरलेले केस अन् विचित्र हास्य… ‘जारण’मधील अनिता दातेच्या लूकने सर्वांचेच वेधले लक्ष
मुलाखतीमध्ये पुढे महेश मांजरेकरांनी आपला मुद्दा मांडला की, “माझ्या महाराष्ट्राने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेकदा वाचवलंय, एवढं लक्षात ठेव. आज ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर जो चाललाय जोरात, त्याचं ८० टक्के श्रेय महाराष्ट्राला जातं. ८० टक्क्यातलं ९० टक्के पुण्याला जातं आणि मग बाकीचं महाराष्ट्राला जातं. त्यामुळे आज महाराष्ट्र इंडस्ट्रीला तारू शकतो. आता फार कोणतेच चित्रपट चालले नाहीत. एकेकाळी कलाकारांचे वर्चस्व असल्याचे मानले जायचे पण आता कळायला लागलंय की, फक्त कलाकारांवर सर्व काही अवलंबून असतं.”
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला चित्रपटप्रेमींनी खूप प्रेम दिलं. ‘छावा’ 11 एप्रिल रोजी (Chhaava OTT Release Date) ‘नेटफ्लिक्स’ (Netflix)या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. दरम्यान, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. ‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेल्या भूमिकेला देशासह परदेशातून प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. त्याचा अभिनय पाहून विकी कौशलचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. महाराणी येसूबाईंची भूमिका ही लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे, तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात संतोष जुवेकर, शुंभकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहे. सर्वच कलाकारांचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक कंपनीने केली आहे.