"देवा माझ्या सचिनला कधी म्हतारं नको करु यार..." संकर्षण कऱ्हाडेने केली मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी खास कविता
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade). आपल्या कलागुणांमुळे अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. मराठी सिनेसृष्टीतील आघाडींच्या कलाकारांमध्ये संकर्षणचं नाव आवर्जुन घेतलं जात. त्याला अभ्यासू अभिनेता म्हणून ओळखलं जात. नाटक, मालिका आणि टेलिव्हिजन शो अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतो. अभिनयाव्यतिरिक्त संकर्षणच्या कविता आणि त्याचं उत्कृष्ट सूत्रसंचालन या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात. अशा या हरहुन्नरी कलाकाराची नुकतीच भेट ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरबरोबर झाली. याचा अनुभव त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सांगितला आहे. शिवाय ‘क्रिकेटचा देव’साठी त्याने स्पेशल कविताही लिहिलीये.
काय सांगता! ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये दिले? स्वतः दिलं उत्तरं…
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना संकर्षणने कॅप्शन दिलंय की, “काय बोलायचं…? फक्तं अनुभवायचं… आज पुण्यात चितळे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करायची संधी मिळाली… पाहुणा कोण होता…? साक्षात ‘क्रिकेटचा देsssव’ भारतरत्न सचिन तेंडुलकर… पाच मिनिटं शांतपणे बोलता आलं… ज्या हातांनी १०० शतकं केली तो हात हातात घेता आला… जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आलं… ‘भारतरत्न’असलेल्या ‘सचिन’बरोबर दोन तास मंचावरती उभं राहता आलं… ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदुस्थान बघायचा त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली… माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अनेकांच्या मनांत आहेत त्या सांगता आल्या अजून काय पाहिजे…? आकाशातल्या देवा sss आभार तू जमिनीवरचा देव दावला…” अशी सुंदर पोस्ट संकर्षण कऱ्हाडेने लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
कार्यक्रमामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सचिन तेंडुलकरसमोर कविताही सादर केली होती.
संकर्षणने खास सचिनसाठी सादर केलेली कविता
एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस
एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस
नेहमीच कसं काय अटीतटीला तू मैदानावर जागतोस…
भेटू दे हा तुझाच देव त्याला मागेल थोडं फार
देवा माझ्या सचिनला कधी म्हतारं नको करु यार…
नियतीचं दिलेलं छोटेपण तुला इतकं काय खटकलं ?
की उभ्या उभ्या अख्खं विश्व तू एकाच बॅटीत झटकलं…
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच दिलंस तू करेज
काही पाळतात तुझं क्रिकेट वेड, तर काही पाळतात तुझं लव्हमॅरेज…
तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं
तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं
की, शाळेत जाणाऱ्या पोरालाही तुला फक्त सचिन म्हणता येतं…
जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही
जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही
आणि जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही
जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही