did mamta kulkarni paid 10 crore to become mahamandaleshwar of kinnar akhara actress reacts to controversy
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी कमालीची चर्चेत आली आहे. एकेकाळी आपल्या स्टाईलने चाहत्यांना क्लीन बोल्ड करणाऱ्या ममता कुलकर्णीने गेल्या काही दिवसांपूर्वी संन्यास घेतला आहे, अनेक वर्ष ती इंडस्ट्री आणि लाइमलाइटपासून दूर राहिली. 24 वर्षांनी ती भारतात परततल्यानंतर तिने संन्यास घेऊन किन्नर आखाड्यात प्रवेश केला, मात्र अवघ्या सात दिवसांत किन्नर आखाड्याने तिला महामंडलेश्वर पदावरून हटवले आहे. अलीकडेच ममताने तिच्या आयुष्यातील अनेक घटनांवरील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
नुकतीच ममता कुलकर्णी लोकप्रिय टीव्ही शो ‘आप की अदालत’मध्ये दिसली. यावेळी तिने अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यात तिच्या वादग्रस्त फोटोशूटपासून महामंडलेश्वर पदावरून हटवण्यापर्यंतच्या प्रश्नांचा समावेश आहे. अलीकडेच, किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममताला महामंडलेश्वर पदावरून बडतर्फ केले. त्यांनी ममतावर किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नर आखाड्याला १० कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर स्वत: ममताने मौन सोडले आहे. ममता कुलकर्णीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
‘आप की अदालत’ शोमध्ये ममता म्हणाली की, “१० कोटी रुपये सोडा, माझ्याकडे एक कोटीही नाहीत. माझी सर्व बँक खाती सरकारकडून गोठवण्यात आली आहेत. जेव्हा मला महामंडलेश्वर बनवण्या आले तेव्हाही मला माझ्या गुरूला दक्षिणा देण्यासाठी २ लाख रुपये उसने घ्यावे लागले होते. तुम्हाला नाही माहित मी कशापद्धतीने जगतेय. माझ्याकडे पैसे नाहीत. मी अश्रू ढाळले हे विनाकारण नाही. मी खूप त्याग केला आहे. माझे तीन अलिशान घरं गेल्या २३ वर्षांपासून बंद असल्यामुळे ते खूपच वाईट अवस्थेत आहेत.”
शोमध्ये ममताला फिल्म इंडस्ट्रीमध्ये परतण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने नकार दिला. ममता म्हणाली की, “मी आता पूर्णपणे संन्यासी झालीये. दुधाचे तुपात रूपांतर झाल्यावर त्याचे मूळ स्वरूप जसे परत येत नाही, त्याचप्रमाणे मीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये न परतण्याचा निर्णय घेतला आहे. मी २३ वर्षे तपस्वी म्हणून जगले आहे.” भारतात परतल्यावर ममता म्हणाली होती की, “मी 23 वर्षांनंतर भारतात आली आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप जोपर्यंत खोटे ठरत नाही आणि माझ्यावर सुरु असलेला न्यायालयीन खटला संपत नाही, तोपर्यंत मी भारतात येणार नाही, असा मी संकल्प केला होता. तेव्हाच मी भारतात पाऊल ठेवले. प्रसिद्धीसाठी ममता कुलकर्णीच्या नावाचा या प्रकरणात समावेश करण्यात आला होता. मी 23 वर्ष ध्यान केले आहे. मी ३-३ महिने अन्नत्याग केले होते. हठयोगाचे पालन करून मी आदिशक्तीला माझ्यासमोर यायला भाग पाडले होते. मी आदिशक्तीला सांगितले, तू येईपर्यंत मी अन्न प्राशन करणार नाही. मी ५ दिवसही पाण्याविना राहिलेय. पंधराव्या दिवशी भगवतीचे दर्शन झाले.
ममता कुलकर्णी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कमालीची चर्चेत राहिली आहे. अंडरवर्ल्ड छोटा राजनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. २००२ साली ममताने ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्नागाठ बांधली. लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर ममता पतीबरोबर केनियाला स्थायिक झाली होती. त्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी बॉलिवूडमधून गायब झाली. अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी ममता आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यशाच्या शिखरावर असताना अचानक तिच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. ममताने ‘तिरंगा’ शिवाय, ‘आशिक’, ‘आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘वक्त हमारा हैं’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘करण अर्जुन’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.. तिला इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडमधील रिजेक्शन क्वीन म्हटलं जायचं, कारण तिने अनेक चित्रपटांची ऑफर धुडकावून लावली होती.