(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेमध्ये षड्रिपूंचा रोमांचक प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडत चालला आहे. मोह या षड्रिपूच्या कहराने आधीच प्रेक्षकांना थरारक अनुभव दिला आहे. आता मालिकेच्या कथानकात पुढचा टप्पा म्हणजे आणखी एका भयंकर, विध्वंसक रिपूचे म्हणजेच काम कामिनीचे आगमन होणार आहे. या भूमिकेत बिग बॉस मराठी फेम अमृता धोंगडे दिसणार आहे. प्रेक्षकांसाठी हा विशेष भाग एक अनोखा अनुभव ठरणार आहेत. तेव्हा ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका कॉलर्स मराठीवर नक्की पाहा.
आगामी भागात रंगमंचावर गूढ लावणीचे सूर गुंजणार आहेत. ढोलकी, पेटी आणि तालाच्या ठेक्यावर एक रहस्यमय नर्तिका अवतरते. तिच्या नृत्यात एक आगळावेगळं तेज, गूढ शक्ती आणि एक भयंकर रहस्य दडलेलं असेल. या नृत्याच्या अविष्कारातून निर्माण होणारे नाट्य मालिकेला एका नव्या उंचीवर नेणार आहे.
हा नवा रिपू केवळ मोहकच नाही, तर अत्यंत कपटी आहे. त्याच्या आगमनाने माया आणि जगदंबेच्या संघर्षातले नवे पैलू उलगडतील आणि प्रेक्षकांसमोर नवा अध्याय सुरू होणार आहे. हा नवा षड्रिपू म्हणजे काम कामिनी, जो मनुष्याला मुळापासून ग्रासणारा आहे. महिषासुराने तिला पाठवण्यामागचा खरा उद्देश काय, याचाही रंजक उलगडा होणार आहे.
अमृता धोंगडे याविषयी बोलताना म्हणाल्या की, ‘मला बऱ्याच वर्षांनी पौराणिक मालिका करण्याची संधी मिळाली. पौराणिक आणि आध्यात्मिक मालिकांच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी कलर्स मराठी वाहिनी ही मालिका सादर करत असल्याने ही भूमिका करायचे मी ठरवले. ही भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. याआधी मी अशा प्रकारचं पात्र कधीच साकारलं नाही.’
पुढे त्या म्हणाली, ‘सुरुवातीला हे पात्र समोर आलं तेव्हा थोडं दडपण आलं, कारण मी आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा पूर्ण वेगळं होतं. पण मी ऑडिशन दिली आणि आपल्या जे नशिबात असत ते आपल्याला मिळतंच, आणि मला होकार आला. माझ्यासाठी ही भूमिका म्हणजे एक मोठं चॅलेंज आहे. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे भाषा थोडी कठीण असली तरी मी माझं १०० टक्के देण्याचा प्रयत्न करते आहे. या पात्राला दोन कंगोरे आहेत, ते साकारताना प्रेक्षकांना नक्कीच एक आगळावेगळा अनुभव मिळेल अशी मला आशा आहे.’