
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘असंभव’ चित्रपटातील नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बहर नवा’ हे गीत प्रेक्षकांच्या मनात कोमल भावनांची एक सुरेल लहर निर्माण करत आहे. अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्यात क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी भावनांचे नाजूक रंग भरले आहेत. तर अमितराज यांच्या संगीताने या गाण्यात अप्रतिम साज चढवला आहे. हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार आहे.
८० च्या दशकातील या गाण्यात मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांच्या आयुष्यातील एक नवा प्रवास दिसत असून नवं नातं, नवी स्वप्नं, नव्या सुरुवातीची कोवळी चाहूल, एकमेकांवरील विश्वास, आणि नव्या आयुष्याची फुलणारी उमेद… हे सगळं एका मोहक दृश्यात बांधलं गेलं आहे. दोघांच्या नात्यातील दरवळ हळूहळू खुलत जाताना दिसते आहे. प्रेम, आपुलकीचा स्पर्श आणि एकमेकांना समजून घेण्याची कोमल जाणीव गाण्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये भावते. हे सगळं दिसत असतानाच प्रिया बापटची एन्ट्री गूढ निर्माण करणारी आहे. हा प्रेमाचा त्रिकोण आहे की आणखी काही ? हे या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.
हार्दिक पांड्याने गुपचूप उरकला साखरपुडा? कथित गर्लफ्रेंड महिका शर्मासोबतच्या पोस्टने वेधले लक्ष
या गाण्याबद्दल निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता सचित पाटील म्हणाले, ”’बहर नवा’ म्हणजे नात्याचं नव्यानं उमलणं… दोन मनांना जोडणारा एक सुरेल श्वास. प्रेम हळूहळू फुलतं, तेव्हा आयुष्याची प्रत्येक पायरी नव्यानं उजळून निघते. हे गाणं त्या नव्या प्रकाशाची गोष्ट सांगतं. हे गाणं म्हणजे आमच्या संगीत टीमची एक सुंदर सांघिक जादू आहे. सूर, शब्द आणि सादरीकरण या तिन्हींच्या संगतीत ‘बहर नवा’ला अशी रंगत आली की, दृश्यांनाही एक वेगळं भावविश्व लाभलं आहे. कथानकातील महत्त्वाच्या टप्प्यात हे गाणं खास रंगत आणते. ‘सावरताना’ गाण्यावर संगीतप्रेमींनी जसं प्रेम केलं तसंच प्रेम प्रेक्षक या गाण्यावरही करतील, याची खात्री आहे.”
संगीतकार अमितराज म्हणाले, ”’बहर नवा’ हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयाशी थेट संवाद साधणारं आहे. या गाण्यात सुर, ताल, आणि संगीताचे प्रत्येक घटक अत्यंत काळजीपूर्वक निवडले गेले आहेत. गाण्याच्या सुरातील हलक्या बहरांनी नव्या नात्यातील कोवळेपणा आणि उमलणारी उमेद व्यक्त केली आहे, तर तालातील सूक्ष्म लयी आणि संगती भावनांच्या वाढीला हातभार लावतात. आम्ही संगीत टीम म्हणून हे गाणं बनवताना या नात्याची संवेदनशीलता आणि कथानकातील महत्त्वपूर्ण भावनांना संगीताद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची जादू प्रेक्षकांच्या मनातही तशीच उमलेल, याची मला खात्री आहे.”
‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील याने केले असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.