
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका इंद्रायणी एका अत्यंत हृदयद्रावक आणि रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. नुकताच या मालिकेने 600 हून अधिक भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. आता ही मालिका एका मोठ्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. आजवर सर्व प्रकारच्या कसोट्यांना सामोरे गेलेली इंद्रायणी आता वकिलाच्या रूपात कोर्टात न्याय मिळवण्यासाठी लढताना दिसणार आहे. ही इंद्रायणीची आतापर्यंतची सर्वात मोठी कसोटी आहे. यात तिला दिग्रसकर घराण्याची प्रतिष्ठा, घरातील नातेसंबंध आणि सत्याची लढाई सांभाळावी लागणार आहे, तसेच श्रीकलाच्या डावपेचांना तोंड द्यायचं आहे. दिग्रसकर कुटुंब कोलमडून पडेल अशा श्रीकलाच्या सगळ्या प्रयत्नांना इंद्रायणी कशी फेल पाडणार? कधीही गिव्ह अप न करणारी इंद्रायणी आता वकिलीचा कोट घालून साम दाम दंड भेद वापरून कशी न्याय मिळवून देणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
दिग्रसकर वाड्यात नुकत्याच घडलेल्या एका दुःखद घटनेने संपूर्ण कुटुंबाचे स्थैर्य ढळले आहे. ज्या वाड्यात एकेकाळी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता केवळ संशयाचे धुके आणि न बोलले जाणारे प्रश्न उरले आहेत. गोपालच्या मृत्यूनंतर घरातील वातावरण कमालीचे संवेदनशील झाले असून, प्रत्येक पात्राला आता स्वतःच्या निर्णयांची आणि भविष्याची भीती वाटू लागली आहे. अपराधीपणाची भावना आणि नात्यांमधील विश्वासाची परीक्षा, यामुळे कथानक आता अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. मालिकेच्या सध्याच्या कथानकात विश्वासाची आणि संयमाची मोठी परीक्षा पाहायला मिळत आहे.
एकीकडे श्रीकला आपले कपटी डाव रचून आणि राजकारण करून संपूर्ण दिग्रसकर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे इंद्रायणी – वकिलाच्या रूपात आपल्या निरागस पण धारदार प्रश्नांच्या जोडीने सत्याचा शोध लावताना दिसत आहे. श्रीकलाच्या वाढत्या पकडीमुळे इंदू कुठेतरी एकाकी पडताना दिसणार पण, तरी तिचा विठुरायावरील विश्वास अढळ आहे.
त्यात आनंदीबाई आता श्रीकलाविरुद्धच्या लढाईत इंदूची ढाल बनून उभ्या आहेत. आनंदीबाईंचा हा बदललेला पवित्रा आणि त्यांचा इंदूला मिळणारा छुपा पाठिंबा वाड्यातील संपूर्ण समीकरण बदलून टाकणारा ठरेल. इंद्रायणी श्रीकलाविरुद्ध पुरावे गोळा करू शकेल का? काय असेल श्रीकलाचा पुढचा डाव? यात इंद्रायणीला अधोक्षजची साथ मिळू शकेल का? व्यंकू महाराज आणि इंद्रायणी यांच्यातील तनाव टोकाला गेल्यावर त्याचे काय परिणाम होतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार.
इंदू आपल्या विठुरायावरील अढळ श्रद्धेच्या जोडीने श्रीकलाचे बुरखे फाडणार का, की संशयाची ही गुंतागुंत नात्यांना कायमची तडा देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पुढील आठवड्यात होणारे ‘भावनिक स्फोट’ आणि सत्याचा नवा पदर प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवतील यात शंका नाही.