
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता खेळ फक्त टास्कपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर प्रत्येक हालचाल रणनीतीने आखलेली दिसतेय. नुकत्याच समोर आलेल्या दोन्ही प्रोमोंमध्ये घरातील चार सदस्य गेममध्ये प्यादे बनून खेळणार कीयातील कोण वजीर होऊन गेम पालटणार?? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या बुद्धी, धैर्य आणि डावपेच यांची कसोटी लागणार असल्याचं स्पष्ट दिसतंय.
याचदरम्यान दुसऱ्या प्रोमोमध्ये घरातील वातावरण अधिकच तापलेलं पाहायला मिळतं. रोशन आणि ओमकार यांच्यात थेट भिडंत होताना दिसत असून, दोघांमधील वाद आता उघडपणे समोर येतोय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, तीव्र शब्दयुद्ध आणि आपली बाजू ठामपणे मांडण्याचा प्रयत्न—या सगळ्यात नेमका कोण सरस ठरणार? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे.
या टप्प्यावर प्रत्येक निर्णय, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक चाल महत्त्वाची ठरणार आहे. मित्र शत्रू बनणार की शत्रूच मित्र होणार? कोणाचा मुखवटा उतरणार आणि कोण खेळाचा खरा मास्टरमाइंड ठरणार, हे पाहणं आता कमालीचं रंजक ठरणार आहे.
ओमकार: “तू तर आता बिळातून बाहेर आला आहेस.” त्यावर रोशन त्याला उत्तर देतो, “बिळात मी नाही लपत, बिळात तुझ्यासारखे लपतात. मी समोर आमनेसामने भिडतो म्हटलं.” यावर ओमकार म्हणतो, “तू विशालच्या हाताखाली लपलेला माणूस आहेस, तुला काय भिऊ मी?”. रोशन पुढे म्हणाला, “माझ्या टोळीतल्या माणसांशी बोलू शकतो, त्यात हिम्मत आहे का राकेशबद्दल बोलायची? तू भिडतो का असा?”