
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सासू-सुनेचं नातं हे आपल्या संस्कृतीत नेहमीच विशेष स्थान राखून आहे. प्रेम, आदर, राग, रुसवे-फुगवे अशा विविध भावनांनी रंगलेलं हे नातं अनेक कथा-कादंबऱ्यांपासून ते चित्रपटांपर्यंत नेहमीच केंद्रस्थानी राहिलं आहे. आता याच नात्याचा एक वेगळा आणि मनोरंजक पैलू उलगडणारा ‘कप बशी’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक वैभव चिंचालकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या ५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘कप बशी’ची निर्मिती सुकल्प चित्र या बॅनरखाली करण्यात आली आहे. कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते असून बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले आहेत.
चित्रपटात निर्मिती सावंत, पूजा सावंत, ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, विनय येडेकर, चिन्मय शिंत्रे, पौर्णिमा तळवलकर आणि आनंद काळे यांसारखी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना उत्कृष्ट अभिनयाची मेजवानी मिळणार, यात शंका नाही. तसेच प्रेक्षक आता हा चित्रपट पाहण्यासाठी जास्त उत्सुक आहेत.
गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन लाभलं आहे. बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.
कथानकाबद्दल सांगायचं झालं, तर अरूण आणि अरूणा हे दांपत्य त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी योग्य मुलगी शोधत असतात. मात्र अरूणाच्या अध्यात्मिक गुरूंनी सूनेबाबत काही विशेष अटी घातलेल्या असतात. त्या अटी पूर्ण करणारी मुलगी मिळते का, त्या अटी नेमक्या काय आहेत, आणि शेवटी हे लग्न जुळतं का या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी ही कथा हलकीफुलकी आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
तुटलेल्या नात्यांना जोडेल का प्रेमाची ताकद? ‘दीपज्योती’ लवकरच झी मराठीवर!
आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडतो. कौटुंबिक नात्यांची गुंफण, विनोद आणि भावनांचा सुंदर संगम असलेला ‘कप बशी’ हा चित्रपट ५ जून रोजी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.