
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पनवेलमध्ये ३१ जानेवारीला “एक नातं असंही” या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग होणार आहे. हे दोन अंकी नाटक प्रत्येकाच्या आयुष्यावर, विशेषत: नात्यांवर प्रकाश टाकणार आहे. नाटकात भावा–बहिणीच्या नात्याची कथा सांगितली आहे. मुंबईतील देशमुख कुटुंबातील कार्तिक आणि काव्या या भावा–बहिणीच्या नात्यातील प्रेम, काळजी, गैरसमज आणि जबाबदारीची गोष्ट या नाटकातून प्रेक्षकांना अनुभवता येईल.
“एक नातं असंही” या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केली असून अभिजीत भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत. नाटकाचे लेखन विस्मय दिपक कासार यांनी केलेले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांचे आहे. या नाटकात अभिनेत्री मृण्मयी सुपल, विस्मय कासार, मोहिनी, प्रवीण भाबल, राजस वैद्य, तन्वी महाडिक, सुजल दळवी या कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकाचे संगीत रुपेश मोहन जाधव यांचे तर प्रकाश योजना निखिल मारणे यांची आहे. या नाटकात काव्याच्या भूमिका अभिनेत्री मृण्मयी सुपलने साकारली असून आजवर अनके मालिका आणि चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या नाटकाच्या निमित्ताने मृण्मयीने पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे.
नाटकाच्या शीर्षकावरूनच हे नाटक एका नात्याची गोष्ट सांगणार असल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. मुंबईच्या एका कॉलनीत एखाद्या सामान्य कुटुंबाप्रमाणेच “देशमुख कुटुंब” राहत असतं. आई, वडील, भाऊ, बहीण या सर्वजणांनी भरलेलं असं एक सुखी कुटुंब. कार्तिक आणि काव्या या भावा बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आधारित आहे. अचानक एक दिवशी देशमुख कुटुंबावर खूप मोठ संकट कोसळतं. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपत. कार्तिक मोठा असल्याने घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येते, त्याला गायक व्हायचं असतं पण एकंदरीत परिस्थिती पाहता गायक होण्याचे स्वप्न तो सोडून देतो आणि बहिणीचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून एका कंपनीत नोकरी करतो. आपल्याला सांभाळणार या जगात एकमेकांशिवाय कोणीच नाही याची त्या दोघांनाही जाणीव असल्यामुळे ते दोघे एकमेकाची काळजी घेतात. दोघेही आता दुःखातून सावरून एकमेकाला सांभाळत असतात. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध चांगले राहतात? एका भावाने बहिणीसाठी आपल्या गायक होण्याच्या स्वप्नाला बाजूला ठेवून केलेल्या त्याग्याची जाणीव बहिणीला राहते का? याची रंजक गोष्ट या नाटकातून आपल्याला पहायला मिळणार आहे.
आजच्या पिढीसाठी नाती जपणं म्हणजे फक्त स्टेटस, रील्स किंवा मेसेजपुरतं मर्यादित न राहता, भावनिक समज, आपुलकी, संयम आणि जबाबदारी यांचा अर्थ काय असतो, ते “एक नातं असंही” या नाटकातून प्रभावीपणे अनुभवता येतं. हे नाटक नात्यांच्या मुळाशी जाऊन आपल्याला आरसा दाखवतं आपण कुठे आहोत आणि कुठे जायला हवं, याची जाणीव करून देतं. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जगात नाती आणि संस्कार यांचं खरं मोल समजून घ्यायचं असेल, तर “एक नातं असंही” हे नाटक प्रेक्षकांनी नक्की पाहावं असे अभिनेत्री मृण्मयी सुपलने सांगितले .
आजच्या जगात जपण्यासारख्या खूप कमी गोष्टी उरल्या आहेत, आपण नेहेमी फक्त त्याच गोष्टी जपतो ज्या आपल्या साठी खास असतात, “एक नातं असंही” हे नाटक सुद्धा तसंच आहे एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट म्हणजे हे नाटक आहे, त्याच बरोबर आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे, कसं ते जाणून घेण्यासाठी हे नाटक तुम्ही नक्की पाहा असे या नाटकाचा लेखक आणि अभिनेता विस्मय कासार याने आवर्जून नमूद केले.