
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने ऑडिशनसाठी बोलावलेल्या 17 लहान मुलांना ओलीस ठेवल्याची घटना 30 ऑक्टोबर रोजी पवई येथील RA स्टुडिओमध्ये घडली. पोलिसांनी वॉशरूममधून प्रवेश करून 17 मुलांची सुटका केली. यावेळी मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि त्याचा एन्काऊंटर केला, ज्यात रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे. नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, आर्य यानं याच प्रकल्पासाठी अनेक मराठी कलाकारांशीही संपर्क साधला होता.
काही सेलिब्रिटींनी त्याच्या स्टुडिओला भेटही दिली होती. या घटनेच्या दोनच दिवस आधीच मराठी अभिनेता आयुष संजीव आरए स्टुडिओमध्ये गेला होता. आता चौकशीतून समोर आलं आहे की रोहितला अनेक मराठी कलाकारांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत चित्रपट करण्याची इच्छा होती. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांचाही समावेश होता. याबद्दल अभिनेते गिरीश ओक यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलाताना सांगितले की, “माझ्याबरोबर काही काळ काम केलेल्या एका व्यक्तीनं रोहित आर्यच्या वतीनं मला त्याच्या चित्रपटातील भूमिकेसाठी संपर्क केला होता.”
गिरीश ओक यांनी पुढे सांगितले , “मला सांगण्यात आलं होतं की, रोहित आर्य यानं यापूर्वी काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे मी त्याला भेटायला तयार झालो. मी सकाळी ११ वाजता स्टुडिओत पोहोचलो आणि तो सुमारे ११.०५ वाजता आला. आम्ही एका सामाजिक विषयावर आधारित प्रोजेक्टबद्दल चर्चा केली. त्यावेळी मी पाहिलं की, स्टुडिओमध्ये अनेक मुलं होती. त्याबद्दल मी त्याला विचारलं, तेव्हा त्यानं सांगितलं की, ती एका कार्यशाळेसाठी आली आहेत. थोड्या वेळानं ती मुलं माझ्याभोवती जमली आणि माझ्याबरोबर ग्रुप फोटो काढला. बाहेर काही पालकांनीही माझ्यासोबत सेल्फी घेतल्या. नंतर साधारण १२ वाजता मी स्टुडिओमधून बाहेर पडलो.”
आयुषबरोबरच गिरीश ओक, उर्मिला कोठारे आणि इतर काही कलाकारांनीही रोहित आर्याच्या स्टुडिओला भेट दिली होती.