
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राज्यात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडत आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. अनेक नेते मंडळी, सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. मराठी अभिनेता आरोह वेलणकरने देखील त्याचा मतदानाचा हक्क बजावत राज्यातील महानगरपालिका निवडणुकतीच मतदान केलं आहे.
मतदान करून आल्यानंतर या अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेचा विषय बनत आहे. या पोस्टमध्ये त्याने कोणाला मतदान केलं आहे. हे स्पष्टपणे जाहिर केले आहे. खरं तर आपण कोणाला मत दिलं हे गुपित ठेवायचं असतं मात्र या अभिनेत्याने जाहीर केलं आहे की त्याने कोणाला मतदान केलं आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अभिनेत्याने त्याचा निळी शाई लावलेला बोटाचा फोटो शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत त्याने भाजपाला मतदान केल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. फोटो पोस्ट करत लिहिलं, ” महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदान करत मी भाजपाला मत दिलं. प्रगतीसाठी हे मत दिलं आहे. तुम्ही मतदान केलं का?”असं कॅप्शनमध्ये अभिनेत्याने म्हटलं आहे.
या कलाकरांनी बजावला मतदानाचा हक्क
आरोह वेलणकरसह प्राजक्ता माळी, अक्षय कुमार, नाना पाटेकर, शशांक केतकर, वीणा जामकर, मिलिंद गवळी, सुबोध भावे आणि चिन्मयी सुमित या अनेक कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या कलाकारांच्या मतदानामुळे निवडणुकीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. दरम्यान, संबंधित महापालिकांचे निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत. विशेष म्हणजे, या २९ महानगरपालिकांसाठी तब्बल ७ ते ८ वर्षांनंतर मतदान होत आहे. त्यातही मुंबई महानगरपालिका निवडणूक सर्वात महत्त्वाची मानली जात असून, येथे कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.