(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे,तो चित्रपट “कुर्ला टू वेंगुर्ला” हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. स्पंदन परिवार या लोकचळवळीतून निर्माण झालेल्या या सिनेमाने रसिक प्रेक्षक, मान्यवर आणि समीक्षक अशा तिघांची प्रचंड पसंती मिळवली. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘कुर्ला टू वेंगुर्ला हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा आहे’ असे म्हटले आहे. तर ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी ‘कुर्ला टू वेंगुर्ला म्हणजे कलेच्या बजबजपुरीत वाजणारं खणखणीत नाणं आहे’ असे विधान केले.
सर्वजण सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल भरभरून लिहू लागले आहेत, आणि चित्रपटाचे कौतुक करत आहेत. माऊथ पब्लिसिटीने चित्रपट चर्चेत होताच तेवढ्यात साउथ चा ‘कांतारा’ हा चित्रपट आला आणि चांगला चालत असलेला “कुर्ला टू वेंगुर्ला” हा जवळजवळ सर्वच थिएटर मधून काढण्यात आला आणि आता फक्त “मूव्हीटाईम हब” या गोरेगाव मधील थिएटरमध्ये या चित्रपटाचा एक शो आहे जो सुद्धा प्रत्येक दिवशी हाउसफुल चालला आहे. बॉलीवूड आणि साउथ च्या चित्रपटांसमोर मराठी चित्रपटांना मिळणारं दुय्यम स्थान हा काही नवीन विषय नाही. यावर चर्चा होतात, प्रपोगेंडा होतो पण ठोस पावलं उचलली जात नाहीत.
६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणात शिल्पा शेट्टीचा नोंदवला जबाब, EOW ने अनेक तास केली चौकशी
“कुर्ला टू वेंगुर्ला” या नितांत सुंदर चित्रपटाबाबतीतही असेच झाले पण कोणत्याही धनाड्य व्यक्ती किंवा कॉर्पोरेटचे पाठबळ नसलेल्या या चित्रपटाने तरीसुद्धा तिसऱ्या आठवड्यात सुद्धा प्रेक्षक खेचून आणला आणि आता तर रसिक प्रेक्षकांनी कमालच केली आहे. थिएटर नाहीत म्हणून वेंगुर्लेकरांनी वेंगुर्ल्यातील मधुसूदन कालेलकर नाट्यगृह येथे या चित्रपटाचे दोन शो लावले आणि बघता बघता दोन्ही शो हाउसफुल झाले आणि अजून शोजची मागणी आली. निर्मात्यांना प्रेक्षकांच्या मागणीनुसार एका दिवसात चार शो लावावे लागले आणि काही मिनिटातच हे चारही शो हाऊसफुल झाले. रसिक प्रेक्षकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला आहे.
मुलांची न होणारी लग्न आणि शहरांना घेऊन असलेले आकर्षण हा विषय घेऊन हसत खेळत निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा शेवटी अंतर्मुख करतो. मराठी चित्रपट चालत नाहीत किंवा ते चांगले नसतात अशी चर्चा करणाऱ्यांचे लेखक अमरजीत आमले आणि दिग्दर्शक विजय कलमकर यांनी “अ’ दर्जाचे उत्तर दिले आहे. पण राजाश्रय नसल्याकारणाने लोकचळवळीतून तयार झालेला हा सिनेमा सर्व दूर पोहोचत नाही आहे जी आत्ताची गरज आहे.
‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा जेवणावरून वाद, नीलम आणि फरहानामध्ये झाले भांडण; अभिषेक- शाहबाज देखील भिडले
वैभव मांगले, सुनील तावडे, वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, साईंकीत कामत, स्वानंदी टिकेकर अशी तगडी स्टारकास्ट घेऊन बनवल्या गेलेल्या या अप्रतिम चित्रपटाला आता खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची गरज आहे. ग्लोबल कोकण, मराठी एकीकरण समिती, शिवस्वराज्य मराठी फेरीवाला संघटना अशा संघटनांनी एकत्रितपणे या चित्रपटामागे उभे राहायचे ठरवले आहे. मराठी राज्यकर्त्यांनी सुद्धा खरंतर ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या अस्सल महाराष्ट्राच्या मातीतल्या चित्रपटामागे उभे राहण्याची आता खरी गरज आहे. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे.