
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बिग बॉस 19 मधून घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरेची सध्या प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. बिग बॉसमुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखीनच वाढ झाली आहे. तीन महिने बिग बॉस 19 गाजवलेल्या स्टॅंडअप कॉमेडियन प्रणितचा देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. प्रणितने बिग बॉस 19 च्या घरात त्याच्या नवीन घराचा उल्लेख केला होता. त्याच्या घराची पहिली झलक आता समोर आली आहे. प्रणितने आई वडिलांसाठी मुंबईत घर घेतले आहे.
बिग बॉसच्या घरात प्रणितनं त्याच्या कठीण काळाविषयी सांगताना नवीन घराचा उल्लेख केला होता. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटामुळे प्रणित आणि त्याच्या आई- वडिलांना त्याचे राहते घर विकावं लागलं होतं. त्याच्या आई – वडिलांची इच्छा होती की त्याने त्यांना कोकणातील त्यांच्या गावी रत्नागिरीत घर बांधून द्यावं. मात्र, आई वडील मुबंईत आपल्या जवळ राहावेत यासाठी प्रणितने घर घेण्याच्या निर्णय घेतला त्याचं हे स्वप्न सत्यात उतरलं. नवीन घराचं काम सुरू असतानाच प्रणित बिग बॉस घरात गेला होता. अशातच आता त्याच्या नवीन घराची झलक समोर आली आहे. Solace Studio च्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे प्रणितच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
प्रणितच्या नवीन घरात भव्य हॉल आहे. या घरात हॉलमध्ये छोटंसं देवघर आहे, जे लक्ष वेधून घेत आहे. घराची सजावट अत्यंत आकर्षक आहे, आणि हॉलमध्ये लहान आणि आरामदायक सोफे देखील आहेत. घराचं रंगकाम आणि इंटेरियर्स देखील सुंदर आहेत. व्हिडीओमध्ये प्रणितच्या घरातील किचन देखील पाहायला मिळाला.
या सगळ्यात लक्षवेधी आहे ती म्हणजे घराची नेमप्लेट.या घराच्या दारावर त्याच्या आई-वडिलांच्या नावांची खास नेमप्लेट आहे, ज्यावर त्याच्या आई-वडिलांचे नाव “सत्यवान आणि वनिता” असे लिहिले आहे. या नेमप्लेटला आकर्षकरीत्या सजवले आहे, आणि घराला देखील त्याच्या आई-वडिलांचे नाव दिले आहे. प्रणितने हे घर फक्त त्यांच्यासाठी घेतल्यामुळे या घराचे सर्व डिझाइन आणि सजावट त्यांच्याशी संबंधित आहे.