शांता गोखले यांना मेटाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई : ‘महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अॅवॉर्ड्स (मेटा) आणि महोत्सव २०२५’ यांच्यातर्फे यंदाचा मेटा जीवनगौरव पुरस्कार शांता गोखले यांना दिला जाणार आहे. ‘मेटा’तर्फे ही घोषणा आज करण्यात आली. यंदा या महोत्सवाचे २०वे वर्ष आहे. शांता गोखले या प्रसिद्ध लेखिका, अनुवादक, पत्रकार आणि नाट्य समीक्षक आहेत. ‘रीटा वेलणकर’ आणि ‘त्या वर्षी’ या मराठी कादंबऱ्यांसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे.
‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख जय शाह यांनी सांगितले, “यंदाची ‘महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अॅवॉर्ड्स’ जाहीर करताना महिंद्रा समुहाला अत्यंत आनंद होत आहे. ‘मेटा’च्या माध्यमातून आम्ही भारतीय रंगभूमीवर काही सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. या महोत्सवाला यंदा २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आम्ही देशभरातील सर्वोत्तम रंगकर्मींची उत्कृष्ट नाटके सादर करीत आहोत.”
‘महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा) अॅंड फेस्टिव्हल’ हा कार्यक्रम नवी दिल्लीत कमानी ऑडिटोरियम आणि श्रीराम सेंटर येथे १३ मार्च ते २० मार्च २०२५ या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात ‘मेटा-२०२५’साठी निवड झालेली नाटके परीक्षक मंडळासमोर, तसेच रसिकांसमोर सादर केली जातील.
‘मेटा २०२५’साठी यंदा २५ राज्यांतील ३६७ नाटके आणि दोन आंतरराष्ट्रीय प्रवेशिका प्राप्त झाल्या. अंतिम यादीत मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांतील नाटकांचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे, या महोत्सवाने समावेशकता आणि विविधतेला प्राधान्य दिले असून ४७ भारतीय भाषा आणि बोलींमधून प्रवेशिका आल्या आहेत. अंतिम १० नामांकने हिंदी, मल्याळम, बंगाली, कन्नड, संस्कृत, बुंदेली आणि इंग्रजी अशा विविध भाषांतील नाटकांसाठी आहेत.
‘मेटा २०२५’च्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त १४ पुरस्कार श्रेणींमध्ये कलावंतांचा सन्मान केला जाईल. यामध्ये जीवनगौरव पुरस्कार तसेच १३ स्पर्धात्मक श्रेणीतील पारितोषिके समाविष्ट आहेत. सर्वोत्तम नाट्यप्रयोग, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम नेपथ्य रचना, सर्वोत्तम प्रकाशयोजना, सर्वोत्तम ध्वनी व संगीतरचना, सर्वोत्तम वेशभूषा, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम अभिनेता, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्तम अभिनेत्री, सहायक भूमिकेतील सर्वोत्तम अभिनेता, सहायक भूमिकेतील सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम मूळ संहिता, सर्वोत्तम संचयन (एन्सेंबल) आणि सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शक अशी ही पारितोषिके आहेत.
‘टीमवर्क आर्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक संजॉय के रॉय म्हणाले, “भारतीय रंगभूमीमधील वैविध्य आणि उत्कृष्टता यांचे सुरेख चित्रण मेटामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. यंदा ‘मेटा २०२५’मध्ये देशभरातील सर्वोत्तम रंगकर्मींचा सन्मान आम्ही करणार आहोत. विविध कथा रंगमंचावर सादर करीत रंगभूमी समुदायाला प्रेरित करण्याचे कार्य ‘मेटा’च्या २०व्या वर्धापन दिनानिमित्ताने आम्ही पुढे नेणार आहोत.”