(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचा गाभा जपत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, मराठी माणसांची व्यथा मांडणाऱ्या या कथेत एक वेगळीच ताकद प्रेक्षकांना दिसणार आहे आणि ती म्हणजे या चित्रपटातील बालकलाकारांची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळणार आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटानंतर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप ‘नाळ 2’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या जोडीला ‘इंद्रायणी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सांची भोयरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमधून या तिघांच्या अभिनयाची झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात त्याबद्दल उत्सुकता अधिक वाढली आहे. छोट्या वयात त्यांनी दाखवलेली अभिनयाची समज ही मोठ्या कलाकारांनाही थक्क करणारी आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधले हे बालकलाकार फक्त संवाद बोलत नाहीत, तर विचार मांडतात आणि म्हणूनच या चित्रपटात त्यांची उपस्थिती केवळ गोड नाही, तर प्रभावी वाटते.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, ”त्रिशा ठोसर आणि भार्गव जगतापला मी ‘नाळ’ पाहिल्यावर घरी बोलावलं होतं. तेव्हाच ठरवलं होतं, या दोघांना घेऊन एक दिवस मी चित्रपट करणार. सांची भोयरबद्दलही ऐकून होतो आणि तिचं काम पाहून मी प्रभावित झालो. हे तिघे कमालीचे गुणी कलाकार आहेत. या वयातही त्यांना अभिनयाची प्रचंड समज आहे. त्रिशा आणि भार्गवने त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारातून हे यापूर्वीच सिद्ध केलं आहे. याही चित्रपटात मला अपेक्षित असं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ”
Diwali 2025: ‘या’ बॉलीवूड गाण्यांशिवाय दिवाळी अपूर्ण, ज्याने वाढेल सणाचा आणखी उत्साह
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत सिद्धार्थ बोडके झळकणार आहेत, तर विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि सयाजी शिंदे हे दिग्गज कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसतील.कथा आणि पटकथा महेश मांजरेकर यांची असून, संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. निर्माते राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध, तर झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.