
(फोटो सौजन्य-Social Media)
मराठी चित्रपट ‘एक डाव भूताचा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या चित्रपटामधील पहिले गाणे देखील रिलीज झाले आहे. तसेच या चित्रपटाचा नुकताच टीजर लाँच करण्यात आला आहे. ‘एक डाव भूताचा’ हा चित्रपट अस्सल मनोरंजन आणि कॉमेडीसह प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अनके मराठी कलाकार कॉमेडीचा तडका देणार आहेत. हा चित्रपटात पाहताना प्रेक्षक लोटपोट हसणार आहेत.
रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भूताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या सोबत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे या सगळ्या मराठी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
तसेच या चित्रपटाचे डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन केले आहे. तर, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन केले आहे. गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन आणि प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि मराठी मधील सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांना चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच या चित्रपटाचा नुकताच धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
हे देखील वाचा- Don 3 : रणवीर सिंग ‘डॉन 3’च्या शॉटिंगसाठी झाला सज्ज, 2025 मध्ये रिलीज होणार चित्रपट!
एक भूत मुक्ती मिळवण्यासाठी एका तरुणाच्या आयुष्यात येते. मुक्ती मिळवून देण्याच्या बदल्यात त्या तरुणाचं प्रेम असलेली तरुणी त्याला मिळवून देण्याचा डाव तरुण आणि भूत यांच्यात ठरतो. त्यामुळे भूताला मुक्ती मिळते का? तरुणाला त्याचं प्रेम मिळतं का ? याची धमाल गोष्ट “एक डाव भूताचा” या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या गोष्टीला प्रेमकथा, विनोदाची रंजक फोडणीही असून अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही सर्व धमाल चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसत असल्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता निश्चितच वाढली आहे. मोठ्या पडद्यावर ही धमाल अनुभवण्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.