
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहावरील चर्चात असलेली मालिका ‘ठरलं तर मग’ गेले कित्येक वर्ष टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातील सायली आणि अर्जुन याची जोडी प्रेक्षकांची पसंती ठरली आहे. नुकत्याच आता ४ डिसेंबर रोजी या मालिकेचे १००० भाग पूर्ण झाले आहेत. आणि सध्या मालिकेत सायलीचा भूतकाळ दाखवण्याचं काम सुरू आहे. लवकरच प्रतिमा आणि रविराज यांच्या अपघाताचा आणि महिपतशी काय संबंध आहे हे शोधण्यात मालिकेची टीम व्यस्त आहे. पुढील खुलासा लवकरच होईल मालिकेमध्ये दाखण्यात आले आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील महत्वाचं पात्र पुर्णा आजी साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. आणि मराठी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. मात्र त्यांच्या अंत्य संस्काराला ‘ठरलं तर मग’ च्या सेटवरील कुणीच उपस्थित झाले नाही. आता मालिकेतील अश्विनने या सगळ्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये अश्विन या पात्राची भूमिका प्रतीक सुरेश या अभिनेत्याने साकारली आहे. अभिनेत्याचा नुकताच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालिका १००० भागांचा टप्पा गाठत असताना व्हिडिओमध्ये अश्विनला विचारण्यात आले की, ‘१००० एपिसोड शूटिंगदरम्यानची एक अशी आठवण कोणती, जी कधीच विसरू शकत नाही?’ यावर उत्तर देताना अश्विनला पूर्णा आजी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची आठवण आली. त्यावर तो उत्तर देत म्हणाला, ‘तीन वर्षातील मला न विसरता येणारी आठवण म्हणजे, पूर्णा आजी गेली तो दिवस… तो दिवस माझ्यासाठी खरंच खूप कठीण होता.’ असे अभिनेता म्हणाला आहे.
अंत्य संस्काराला का गेले नाहीत कलाकार?
अश्विन पुढे म्हणाला, ‘आजी त्यादिवशी गेली आणि आम्हाला काही कारणास्तव शूट करावं लागलं होतं, कारण एपिसोड तयार झाले नव्हते. त्यादिवशी खरंच खूप वाईट वाटलं होतं. माणूस गमावल्याचं दुःख तर होतंच, ती आमची आजी होती… त्यात आम्हाला जाता नाही आलं आणि शूट करावं लागलं. याचं जास्त दुःख होत. तो एक दिवस खरंच न विसरता येण्यासारखा आहे.’ ‘ठरलं तर मग’ चं शूटिंग मुंबईत मढ आयलंडला होतं. मात्र पूर्णा आजी यांचं निधन पुण्याला झालं. त्यामुळे शूटिंग असल्याने कोणत्याही कलाकाराला जाता आलं नाही. याचं त्यांना खूप वाईट वाटलेलं.’ असे अभिनेता प्रतीक सुरेश म्हणाला.
राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे १६ ऑगस्ट रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने कलाकारांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांना देखील प्रचंड मोठा धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटामध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. तसेच त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्यांच्या मालिकेला आणि त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आहे.