(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या वीण दोघातली तुटेना मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान चर्चेत आहे. अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. जी जाणून तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. अभिनेत्रीला अलिकडेच ‘महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्यामुळे ती खूप आनंदी झाली असून अभिनेत्रीने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे.
‘The Traitors’ साठी करण जोहरला मिळाला सर्वोत्कृष्ट होस्ट पुरस्कार; सोशल मीडियावर शेअर केला आनंद
अभिनेत्री तेजश्री प्रधानने या पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. यानिमित्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तेजश्रीने लिहिले की, ‘आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे, यशासकट अन् अपयशासकट… न थकता… न डगमगता… उरी विश्वास बाळगून… की जाणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो.’
अभिनेत्री पुढे लिहिले, ‘ते सर्व वेचत चालत राहणे आणि मग, एक छानसा विसावा घेणे त्यात थोडा आढावा! करून ठेवलेल्या गोष्टींचा… चुकलेल्याचा… बरोबर गोष्टींचा… मायबाप प्रेक्षकाच्या प्रेमाचा… टीकेचा… आपुलकी दाखवणाऱ्या सहकलाकारांचा… हितचिंतकांचा आणि निंदकांचा… मग अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं, “आमचं लक्ष आहे, तुमच्या वाटचालीवर” आणि मग मन पुन्हा नव्या जोमाने विश्वासाने पुढे चालू लागतं, पुन्हा एकदा.’
‘ह्या वेळी हे कोणीतरी फार महत्वाचं आहे माझ्या कलाक्षेत्रातल्या प्रवासासाठी. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४. महाराष्ट्र शासनाचे आणि माननीय मंत्री, सांस्कृतिक कार्य, माननीय ॲड. आशिष शेलार यांचे खूप खूप आभार या केलेल्या सन्मानासाठी.’ असे लिहून अभिनेत्रीने आपला आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान तेजश्रीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर चाहत्यांसह किशोरी अंबिये, ऋतुजा बागवे, छाया कदम या तिच्या कलाविश्वातील मैत्रिणींनीही तिचे अभिनंदन केले.
तसेच अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. तिच्यासह अभिनेता सुबोध भावे देखील मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती अलिकडेच तिचा ‘असा मी अशी मी’ हा सिनेमा देखील रीलिज झाला. ज्यामध्ये अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत तिची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. तसेच तेजश्रीने अनेक मराठी चित्रपटामध्ये आणि मालिकांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. आणि चाहत्यांच्या मनात घर केले आहे.






