
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी 6 ‘ सध्या घराघरात चर्चेचा विषय ठरत आहे. बिग बॉस मराठी ६चा पहिला आठवडा वादाच्या ठिणग्यांनी, टास्कने आणि काही भावुक क्षणांनी गाजला. रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १७ सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला ‘भाऊचा धक्का’ पार पडणार आहे.
या ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. अखेर वेळ आली आहे ती या सगळ्या वादाचा हिशोब करण्याची. सुपरस्टार रितेश देशमुख आज पहिल्या ‘भाऊच्या धक्क्यावर’ सदस्यांची कानउघडणी करताना दिसणार आहे. कानउघडणी सोबतच रितेश काही सदस्यांचे कौतुक देखील करणार आहे. रितेशने सर्वात लाडका आणि प्रभावी सदस्य प्रभु शेळके याच्या खेळाचे तोंडभरून कौतुक केले.
प्रभुने आपल्या साध्या आणि विनोदी स्वभावाने प्रेक्षकांचे तसेच रितेश भाऊचेही मन जिंकले आहे. त्याच्या मनोरंजनाच्या शैलीवर भाष्य करताना रितेश देशमुख म्हणाला, “प्रभु, बाहेरच्या दुनियेत तु एक कॅमेराने कंटेंट बनवतो, इथे १०० कॅमेरे आहेत. तु हसवलत, तु रडवलत. मी बाकी सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही याला छोटा समजत आहात, पण या आठवड्यातले हे खरे एंटरटेनमेंटचे डॉन आहेत!”
रितेश भाऊच्या या शब्दांनी प्रभु शेळके भावूक झाला आणि त्याने नम्रपणे सर्वांचे आभार मानले. घरात इतर सदस्यांच्या तुलनेत प्रभु जरी शांत वाटत असला तरी, त्याच्या या ‘डॉन’ अवताराने आता सदस्यांमध्ये त्याची एक वेगळीच दहशत निर्माण होईल यात शंका नाही.
या सीझनमध्ये काही स्पर्धकांनी पहिल्याच आठवड्यात घरात धुमाकूळ घातल्याचं आपण पाहिले. यामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय बनली ती म्हणजे तन्वी कोलते. पहिल्या दिवसापासून तन्वी घरात मोठ्यांशी उद्धट बोलताना दिसली, मनासारखं झालं नाहीतर रडत होती. या सगळ्याचा आढावा आज रितेश भाऊ घेणार आहे. या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणा कोणाची शाळा घेणार हे पाहणं म्हत्त्वाचे ठरणार आहे.