‘जर्सी’ चित्रपटामध्ये स्त्रीच्या विविध छटा – मृणाल ठाकूर
झी सिनेमावर (Zee Cinema) २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ‘जर्सी’चा(Jersey) जागतिक टीव्ही प्रीमिअर (Jersey TV Premier) होणार आहे त्यानिमित्ताने या सिनेमात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या मृणाल ठाकूरच्या (Mrunal Thakur) मुलाखतीचा हा सारांश.
तुला अगदी विविध भूमिकांमध्ये, विशेषत: सशक्त महिलांच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिलं आहे. तू तुझ्या भूमिका कशा निवडतेस? तुला कशा प्रकारच्या व्यक्तिरेखा रंगवायला आवडतात? उत्तर – एक अभिनेत्री असल्या कारणाने चित्रपटांतील भूमिकांद्वारे तुम्हाला अनेक व्यक्तींचं जीवन जगण्याची संधी मिळते. मी तर अशा संधीचा जास्तीत जास्त लाभ घेते. मला प्रवाहाबरोबर वाहात जायला आवडतं. पण मला केवळ कुणाची तरी पत्नी किंवा प्रेयसीची भूमिका साकारण्याची इच्छा नाही. मला व्यावसायिक महिलेच्या भूमिका साकारायची इच्छा आहे. मी जेव्हा एखादी भूमिका निवडते, तेव्हा माझं पहिलं प्राधान्य चित्रपटाच्या पटकथेला असतं आणि त्यातून मला त्या भूमिकेसाठी कोणकोणती आव्हानं स्वीकारावी लागणार आहेत, त्याकडे असतं. केवळ मेक-अप आणि वेशभूषेने आमची कामगिरी सुधारत नसते, तर आम्ही आमच्या व्यक्तिरेखेशी किती समरसून जातो, त्यावर तिची कामगिरी अवलंबून असते. मी आजवर ज्या ज्या भूमिका साकारल्या, त्या सर्व कोणत्या ना कोणत्या व्यावसायिक महिलेच्या होत्या. कधी पत्रकार, कधी डॉक्टर, कधी रिपोर्टर आणि आता ‘जर्सी’मध्ये मी एक रिसेप्शनिस्ट आहे. यातील सर्व भूमिका स्वतंत्र आहेत. पटकथेत मी एकाच गोष्टीकडे बारकाईने लक्ष देते आणि ती म्हणजे त्याची कथा. मला अशा चित्रपटामध्ये भूमिका रंगवायची आहे, जो चित्रपट जगभरातील लोकांच्या स्मरणात राहील.
‘जर्सी’तील तुझ्या विद्याच्या व्यक्तिरेखा कशी आहे ? तू या भूमिकेकडे कशी आकर्षित झालीस? उत्तर – मी विद्यासारखी व्यक्तिरेखा यापूर्वी कधी साकारलेली नाही. माझ्या आजवरच्या सर्व भूमिकांपेक्षा ती अगदी विरुध्द आहे. मला माझ्या व्यक्तिरेखांबाबत प्रयोग करायला आवडतात. यात मी आपल्या अटींवर जीवन जगणाऱ्या एका महिलेची भूमिका साकारीत आहे. ‘जर्सी’मध्ये लोकांना एका महिलेच्या स्वभावाला किती विविध छटा असू शकतात, ते पाहायला मिळेल. एक महिला ही आई असते, पत्नी असते, कुटुंबियांचा आधार असते, दुसऱ्याला विसाव्याचे स्थान असते आणि एक गृहिणी असते. मानवी जीवनातील नाट्य मला सर्वाधिक आकर्षित करतं आणि मला अशा भूमिका साकारण्याची संधी मिळते आहे, याचा आनंद वाटतो. विद्या ही मनाने कणखर असून ती आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्यास समर्थ आहे. मी या चित्रपटाशी त्या दृष्टिकोनातून जोडली गेले आहे.
शाहीद कपूरविषयीचे काही रंजक किस्से सांगता येतील? त्याच्याबरोबर चित्रीकरण करण्याचा अनुभव कसा होता ? उत्तर – शाहीद हा खरंच एक लाघवी मनुष्य आहे. तो जी भूमिका साकारीत असतो, त्यातच तो गुंतलेला असतो. त्याच्याकडून मी एक गोष्ट मात्र शिकले आणि ती म्हणजे, कोणत्याही गोष्टीचं निरीक्षण करून ती गोष्ट आपल्या अंगी कशी मुरवायची. चित्रीकरण करताना मला ही गोष्ट खूप जाणवली की अगदी बारीकसारीक गोष्टींचं निरीक्षण करणं किती गरजेचं आहे. कारण त्यात अनेक छुपे मग तो प्रसंगाचं चित्रीकरण असो की डबिंग करणं असो.
चित्रीकरणाच्या वेळी घडलेली एखादी रंजक घटना सांग. उत्तर – हा चित्रपट चित्रित करण्याची सारी प्रक्रियाच रंजक होती. पण एखादा रंजक प्रसंग सांगायचा झाला, तर मी जेव्हा शाहीद कपूरचच्या श्रीमुखात मारते, त्या प्रसंगाबद्दल सांगता येईल. तो प्रसंग साकारताना मी खूपच धास्तावले होते. मला तो प्रसंग नीट करताच येईना. पण शाहीद हा खरोखरच एक फार चांगला माणूस आहे. त्याने मला एक टिप दिली. त्याने मला सांगितलं की तू तुझ्या सर्व माजी बॉयफ्रेंडना आठव आणि मग माझ्या तोंडात मार. गंमत म्हणजे, ती युक्ती अगदी यशस्वी ठरली!
या चित्रपटापासून तू काय शिकलीस? उत्तर – ‘जर्सी’तून मी ही गोष्ट शिकले- तुम्हाला जी गोष्ट मनापासून हवी असते, ती मिळविण्यासाठी काळाचं बंधन नसतं आणि तुम्ही केवळ जिवंत राहू नका- आपलं जीवन भरभरून जगा!
Web Title: Mrunal thakur interview about jerey movie nrsr